नियामे (नायजेर) :- लष्कराने बंडखोरी करून अध्यक्षांना ताब्यात घेतलेल्या नायजेरमध्ये जिहादींनी मोठा हल्ला घडवून आणला असून या हल्ल्यात किमान 17 जण ठार झाले आहेत. तर 24 जण जखमी झाले आहेत. नायजेरमधील साहेल भागामध्ये हा जिहादी हल्ला झाला.
अध्यक्षांच्या सुरक्षा दलांनी गेल्या महिन्यात केलेल्या बंडामुळे जिहादींविरोधातील कारवाई क्षीण होण्याची भीती युरोपातील देशांकडून व्यक्त होऊ लागली असतानाच जिहादींनी हा हल्ला केला आहे.
नायजेरमध्ये अमेरिका आणि फ्रान्सचे लष्करी तळ आहेत. या दोन्ही देशांच्या सैन्यदलांनी तेथील लष्करी कारवाईला स्थगिती दिली आहे. त्यामुळेच जिहादींनी आपल्या कारवाया पुन्हा सुरू केल्या आहेत.
तिलाबेरी भागातील बोनी आणि तोरोडी या गावांमधील लष्करी तळांवर मंगळवारी हल्ले करम्यात आले होते, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. या हल्ल्यातील जखमींना राजधानी नियामे येथे हलवण्यात आले आहे.
नायजेरमध्ये गेल्या 6 महिन्यातला हा मोठा जिहादी हल्ला आहे. इस्लामिक स्टेट आणि अल कायदाशी संबंधित जमात नुसरत अल इस्लाम वल मुस्लिमीन या गटाने हा हल्ला केल्याचे मानले जाते आहे. बंडखोरीमुळे सुरक्षा व्यवस्था सैल झाल्यामुळे हा हल्ला झाला. दरम्यान, शेजारील देशांनी नायजेरमधील बंडखोरांविरोधात लष्करी कारवाईचा इशारा दिला आहे.