लाहोर – पाकिस्तानच्या लष्कराने माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ गटाचे सर्वेसर्वा नवाझ शरीफ यांना दोन पर्याय दिले आहेत. एकतर नवाझ शरीफ यांनी स्वतः देशाचे पंतप्रधानपद स्वीकारावे किंवा नवाझ यांच्या कन्या मरियम नवाझ यांना पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री केले जावे, असे दोन पर्याय पाक लष्कराने नवाझ शरीफ यांच्या समोर ठेवले आहेत.
चौथ्यावेळी देशाचे पंतप्रधान होण्याची संधी मिळाली असताना नवाझ यांनी धाकटे बंधू शेहबाझ शरीफ यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे का केले, यामागील खरे कारण आता उघड झाले आहे. पीएमएल-एन पक्षाच्या अंतर्गत सूत्रांकडून ही माहिती मिळते आहे.
आगोदर जाहीर केल्याप्रमाणे पंतप्रधान होण्याची संधी नवाझ यांनी का गमावली, यावर पाकिस्तानमध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. नवाझ शरीफ यांच्या कन्या आणि नवाझ शरीफ यांच्या राजकीय वारसदार मरियम नवाझ यांना पंजाबच्या मुख्यमंत्री करण्यासाठीच नवाझ यांनी पंतप्रधानपदावर पाणी सोडल्याचे सूत्रांनी सांगितले.
नवाझ शरीफ यांना पंतप्रधान बनता आले असते, मात्र मरियम यांना पंजाबच्या मुख्यमंत्री करता येऊ शकले नसते. कन्येच्या प्रेमापायी नवाझ यांनी पंतप्रधानपदाचा त्याग केला, असे सूत्रांनी सांगितले.
सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पक्षाची कामगिरी फासशी चमकदार न झाल्यानंतर लष्कराने नवाझ यांना दोन पर्याय दिले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला.पाकिस्तानच्या आजवरच्या ७५ वर्षांच्या राजकीय प्रवासामध्ये लष्कराचे वर्चस्व सर्वाधिक काळ राहिले आहे.
देशाची सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाबाबत पाक लष्कराचाच निर्णय अंतिम राहिला आहे. लष्कराने सुचवलेल्या पर्यायानुसार नवाझ यांनी पंतप्रधान पद स्वतःकडे घेतल्यास पंजाबचे मुख्यमंत्रीपद पुन्हा धाकटे बंधू शेहबाझ शरीफ यांना देण्यात यावे.
जर पंजाबचे मुख्यमंत्रीपद कन्या मरियम नवाझ यांना द्यायचे असल्यास पंतप्रधानपद शेहबाझ यांना देण्यात यावे, असे सुचवण्यात आले आले होते. यापैकी नवाझ शरीफ यांनी दुसऱ्या पर्यायाची निवड केली.
पाकिस्तानच्या लष्कराने पंतप्रधानपदासाठी शेहबाझ शरीफ यांना अधिक पसंती दिली असल्यामुळे नवाझ शरीफ यांना बाजूला होणे क्रमप्राप्त होते, असेही सूत्रांनी म्हटले आहे.
पंतप्रधान निवडीच्या मुद्यावरून पाकिस्तानमध्ये सोशल मीडियावर हॅशटॅग गीव्ह नवाझ टू पाकिस्तान हे अभियान चालवले जाते आहे. यातून पंतप्रधान म्हणून शेहबाझ यांची निवड केली जाणे,
सर्वसमान्यांना रुचले नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शेहबाझ यांच्या निवडीमुळे नवाझ शरीफ यांची राजकीय कारकिर्द संपली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.