मॅक्‍सवेलवरून रंगले ट्‌विटर वॉर

बंगळुरू आणि पंजाब आमने-सामने

चेन्नई,  -आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला शुक्रवारी (9 एप्रिल) धडाक्‍यात सुरुवात झाली. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या पहिल्याच सामन्यात विराट कोहलीचा नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) गतविजेत्या मुंबई इंडियन्सला दोन विकेटस्‌नी पराभूत करत विजयी सलामी दिली. 

या सामन्यात प्रथमच आरसीबीकडून खेळणारा ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्‍सवेल चमकला. त्याचवेळी मॅक्‍सवेलवरून आरसीबी व त्याचा पूर्वाश्रमीचा संघ पंजाब किंग्ज यांच्यात ट्‌विटर वॉर रंगले.

मागील हंगामात पूर्णतः अपयशी ठरल्यानंतर ग्लेन मॅक्‍सवेलला पंजाब संघ व्यवस्थापनाने करारमुक्‍त केले. त्यानंतर यंदाच्या आयपीएल लिलावात आरसीबीने त्याला तब्बल 14.25 कोटी रुपयांची मोठी बोली लावत आपल्या संघात सामील करून घेतले.

हंगामातील पहिल्याच सामन्यात मुंबईने दिलेल्या 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मॅक्‍सवेलने तुफान फटकेबाजी करत 39 धावांची निर्णायक खेळी केली. कृणाल पंड्याने टाकलेल्या डावातील दहाव्या षटकात त्याने 100 मीटरचा उत्तुंग षटकार खेचला. त्यावेळी आरसीबीने ट्‌विट करत लिहिले की,
“लाल आणि सोनेरी कपड्यांमध्ये मॅक्‍सवेलचा पहिला षटकार चेन्नईच्या बाहेर गेला. धन्यवाद पंजाब किंग्ज.’

यावर प्रत्युत्तर देत पंजाब किंग्जने ट्‌विट केले, ओहह.. गेल, केएल, मनदीप, मयंक आणि सर्फराजसाठी धन्यवाद’. हे सर्व खेळाडू पूर्वी आरसीबीचा भाग होते. त्यानंतर पलटवार म्हणून पंजाब किंग्जच्या नव्या जर्सीवरून आरसीबीने त्यांची खिल्ली उडवली. त्यांनी ट्‌विट केले, तुम्ही जर्सी, लोगो आणि पॅड्‌स विसरला. आपल्यात कोण हे मोजत राहणार.’

दरम्यान, पंजाब किंग्ज संघाची नवी जर्सी ही आरसीबीच्या मागील काही जुन्या जर्सीशी मिळती-जुळती आहे. यापूर्वी देखील चाहत्यांनी पंजाब किंग्जला “आरसीबी लाईट’ म्हटले होते. यामुळे यंदाच्या हंगामात बंगळुरू आणि पंजाब यांच्यात रोमहर्षक सामना पाहण्याची संधी क्रिकेटप्रेमींना मिळणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.