पालिकेचे कंपन्यांना साकडे
पुणे – करोना गंभीर रुग्णांना ऑक्सिजन मिळाल्यास त्यांचा जीव वाचविणे शक्य आहे. त्यामुळे शहरातील खासगी तसेच शासकीय रुग्णालयांना करण्यात येणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यात कोणताही खंड पडू देऊ नका, असे साकडे महापालिकेकडून पाच प्रमुख वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना केले आहे. या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी शुक्रवारी महापालिकेत घेतली.
अग्रवाल म्हणाल्या, शहरात सध्या ऑक्सिजन बेडची आवश्यकता सर्वाधिक आहे, अशा स्थितीत जे बेड आहेत त्यासाठीही नियमितपणे ऑक्सिजन पुरवठा होणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन शहरातील प्रमुख पाच कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली.
यात त्यांना पुरवठा करण्यात काही अडचणी आहेत का, महापालिकेकडून काही मदत हवी आहे का, त्यांना ऑक्सिजननिर्मिती तसेच इतर आवश्यक बाबींसाठी महापालिका कशाप्रकारे मदत करू शकते. याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच शहरात ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात असताना पुरवठा कोणत्याही स्थितीत खंडीत होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.