विजयाचा उन्माद रोखायला हवा (अग्रलेख)

मोदींच्या विजयाचे गोडवे सर्वत्र गायले जात आहेत. त्यांचे राजकीय यश देदीप्यमान असल्याने त्याचा जल्लोष साजरा होणे स्वाभाविक असले तरी हा जल्लोष आता उन्मादात परावर्तित होऊ लागला आहे, ही आज चिंतेची बाब ठरत आहे. गेल्या एक-दोन दिवसांत घडलेल्या काही घटना आणि भाजप समर्थकांकडून सोशल मीडियावर व्यक्‍त होणाऱ्या प्रतिक्रिया या उन्मादी वातावरणाची साक्ष मानली पाहिजे. काही विचारवंतांनी, कलाकारांनी किंवा लेखक-साहित्यिकांनी त्यांच्या तात्त्विक भूमिकेतून मोदींच्या कार्यशैलीवर किंवा त्यांच्या राजकीय भूमिकेवर वेळोवेळी टीका केली आहे. पण जेव्हा यातल्याच काही लोकांनी मोदींचा विजय झाल्यानंतर त्यांचे दिलखुलास अभिनंदन करणारे संदेश दिले त्यावेळी भाजप किंवा मोदी समर्थकांकडून अर्वाच्य भाषेत या व्यक्‍तींवर प्रतिक्रिया दिल्या गेल्या आहेत. हा उन्माद आता काही बाबतीत इतक्‍या टोकाला गेला आहे की मोदींच्या टीकाकारांकडून होणारे मोदींचे अभिनंदनही त्यांना मान्य नाही. या संबंधातील अनेक उदाहरणे या ठिकाणी नावानिशी देता येतील.

अर्वाच्य भाषेतील या ट्रोलिंगच्या बातम्याही काही ठिकाणी प्रसारित झाल्या आहेत. अनुराग कश्‍यप यांच्याबाबतीत तर त्यांच्या मुलीवरच एका ट्रोलरने बलात्कार करण्याची धमकी दिली आहे. हा सारा प्रकार अवाक्‌ करणारा आहे. शबाना आझमी यांनी मोदींचे अभिनंदन केल्यानंतर, तुम्ही अजून भारतात कशा? असे प्रश्‍न त्यांना विचारले गेले आहेत. हाच प्रकार स्वरा भास्कर यांच्याबाबतीतही घडला आहे. मोदी समर्थकांच्या उन्मादाचा रोष उर्मिला मातोंडकर, निखील वागळे, पुण्यप्रसुन वाजपेयी, रविशकुमार यांच्या सारख्यांनाही सहन करावा लागत आहे. हे सगळे लोकांच्या देखत घडत आहे. पण त्यांना रोखणारा अजूनही कोणी पुढे आलेला नाही. जे सोशल मीडियावर तेच आता काही ठिकाणी रस्त्यावरही दिसू लागले आहे. गुडगावात काल रात्री एका मुस्लीम नागरिकावर “जय श्रीराम’ म्हणण्याची सक्‍ती करण्यात आली. ती त्याने मान्य न केल्याने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रकार घडला. मध्य प्रदेश, राजस्थानातही असेच काही आक्षेपार्ह प्रकार घडल्याचे कानावर आले आहे.

मोदी भक्‍तांकडून किंवा भाजप समर्थकांकडून होणाऱ्या या प्रकारांबद्दल खुद्द मोदींना किंवा भाजपच्या नेत्यांना थेट दोषी धरता येणार नाही हे जरी खरे असले तरी आपल्याच समर्थकांकडून हे प्रकार होत असल्याने त्यांना रोखण्याची नैतिक जबाबदारी त्यांच्यावरच येते हेही नाकारता येणार नाही. आम्ही अशी उन्मादी मानसिकता जोपासलेली नाही हे भाजप नेतृत्वाने आता आपल्या कृतीतून दाखवण्याची वेळ आली आहे. मोदींच्या या विजयाला धर्माच्या वर्चस्वाची झालर आहे. त्यामुळे हा उन्माद आक्रमक धार्मिक मानसिकतेतून पुढे येत असेल तर तो अधिक घातक आहे.

राजकीय प्रक्रियेतून मिळालेल्या विजयाला स्वधर्माच्या विजयाचे लेबल लावण्याच्या मानसिकतेतून हे घडत असेल तर त्याला वेळीच चाप लावणे हे देशाच्या एकूणच सामाजिक स्थैर्यासाठी आवश्‍यक बनले आहे. पण मुळात एखाद्याने मोदींचे अभिनंदन करण्याचा दिलेला संदेश हा दिलखुलासपणे अभिनंदन स्वीकारण्याचा क्षण असतो. पण तोच धुडकावून असा संदेश देणाऱ्यालाच धमकीवजा भाषा वापरून त्याचा उपमर्द करणे ही कोणती मानसिकता? ही मानसिकता एका रात्रीत जन्माला आलेली नाही. ती गेल्या काही काळापासून जोपासली गेली आहे.

राजकीय यश मिळवण्यासाठी ही मानसिकता जोपासली असेल तर आता अपेक्षित उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर तरी या मानसिकतेतून निर्माण होणारा उन्माद जाणीवपूर्वक रोखला गेला पाहिजे. अर्थात, या साऱ्या पार्श्‍वभूमीवर एक गोष्ट चांगली घडली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच या विजयावर प्रतिक्रिया देताना जनतेने दिलेला कौल नम्रतेने स्वीकारला जाईल अशी अपेक्षा व्यक्‍त केली आहे. संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी निवडणुकीतील यशाबद्दल संघातर्फे प्रतिक्रिया देताना जे निवेदन प्रसिद्धीला दिले आहे त्यात त्यांनी ही अपेक्षा व्यक्‍त केली आहे. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सर्व कटुता संपेल आणि जनतेने दिलेला कौल नम्रतेने स्वीकारला जाईल अशी अपेक्षा व्यक्‍त करतानाच नम्रता स्वीकारा असा स्पष्ट संदेश संघाने दिला आहे.

विजयाचा जल्लोष साजरा करण्याऐवजी आता देश आणि अर्थव्यवस्था सावरण्याच्या कामाला लागा, असाच संदेश बहुधा त्यांना द्यायचा असावा. खुद्द मोदींनीही भाजप व एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांच्या गेल्या शनिवारी झालेल्या, सेंट्रल हॉलमधील बैठकीत प्रतिमा बदलाचे सूतोवाच केले आहे. आपल्या दुसऱ्या टप्प्यातील सरकारची प्रतिमा बदलून सर्वसमावेशक व उदारमतवादी भूमिकेचा अंगीकार करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. ही एक स्वागतार्ह बाब मानली पाहिजे.

मुस्लीम समुदायाशीही जुळवून घेण्याची भूमिका त्यांनी प्रथमच मांडली असून “अब हमारा कोई पराया नहीं हो सकता,’ असे ते म्हणाले आहेत. आम्हाला मत देणारे आणि आमचा घोर विरोध करणारे यात आम्ही अंतर पडू देणार नाही, असे पंतप्रधान म्हणाले आहेत. ही निश्‍चित सुखावह बाब आहे. प्रश्‍न फक्‍त विश्‍वासार्हतेचा आहे. मोदी भाषणात जी भूमिका मांडतात त्याच भूमिकेनुसार ते कृती करतात हे फार कमी वेळा दिसून आले असल्याने चिंता कायम राहते एवढेच. निवडणूक प्रचाराच्या भाषणात देशातील प्रत्येक गोष्टींचे खापर नेहरूंवर फोडणाऱ्या मोदींनी आज नेहरूंच्या पुण्यतिथीदिनी दिलेल्या संदेशात नेहरूंच्या राष्ट्रउभारणीतील कार्याचा गौरव केला आहे. मग यातले खरे मोदी कोणते? हा भ्रम लोकांमध्ये निर्माण होतो.

आज मोदी संवादाचे राजकारण करून सरकारची प्रतिमा बदलण्याच्या मनस्थितीत असतील तर ते शेवटपर्यंत आपल्या याच भूमिकेत कायम राहोत अशीच देशवासीयांची भावना आहे. याच भूमिकेतून मोदींनी आता आपल्या उन्मादी समर्थकांनाही आवरण्याची गरज आहे. निदानपक्षी त्यांना कडक शब्दांत समज तरी त्यांनी देणे अपेक्षित आहे. निवडणुकांमध्ये विद्वेषी प्रचाराने मनात निर्माण झालेला विखार लवकर विझायला हवा. वाजपेयींच्याच भाषेत सांगायचे तर सरकारे येतील-जातील हे लोकतंत्र आणि देश टिकला पाहिजे आणि आता त्याच्या पुढे जाऊन असे म्हणावे लागेल की आता विजयाचा उन्मादही पूर्णपणे थांबायला हवा. विजयोत्सवालाही मर्यादा हवी, विजयोत्सव शालीन असलेलाच खूप शोभून दिसतो.

Leave A Reply

Your email address will not be published.