पुणे – शहरातील सुमारे 3500 करोनाबाधित रुग्ण ऑक्सिजनवर असून, यात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळेच या व्यवस्थेवर ताण आला असून ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे.
गेल्या महिनाभरात ऑक्सिजनवरील रुग्णसंख्येत सातत्याने वाढ झाली असून, ऑगस्टच्या सुरुवातीला शहरात दोन हजार करोनाबाधितांना ऑक्सिजनची गरज होती; परंतु ही संख्या आता 3499 झाली आहे. ऑक्सिजन बेडवरील सर्वच रुग्णांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनपुरवठा करण्यासाठी सध्या सरकारी आणि खासगी यंत्रणांची धावपळ होत असून, तो कमी पडू नये यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न केले जात आहेत.
महापालिकेतर्फे ऑक्सिजन रिफिलिंग करून घेतले जात असून, आगामी काळात त्याचा तुटवडा निर्माण होऊ नये, याच्या सूचना संबंधित पुरवठादाराला देण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. सध्यातरी त्याचा तुटवडा भासू दिला जात नाही. ाज्यात सर्वाधिक करोना चाचण्या पुण्यात होत असून, चाचण्यांची संख्या वाढवण्यात आल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त आहे.
5 लाख नागरिकांच्या चाचण्या…
शहरात आजपर्यंत सुमारे 5 लाख नागरिकांच्या करोना चाचण्या झाल्या आहेत. त्यात 1 लाख 11 हजार 927 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. शहरात 1040 रुग्ण गंभीर आहे. त्यात 583 रुग्ण व्हेंटिलेटरवर, तर 3499 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 92 हजार 614 एवढी झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या दिलासा देणारी आहे. शहरात 16,677 रुग्ण सक्रिय रुग्ण असून, आतापर्यंत 2 हजार 625 जण दगावले आहेत.