नदी पात्रासाठी महापालिका, पीएमआरडीएचा आराखडा

हरित लवादाच्या दणक्‍यानंतर जाग : प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न

पिंपरी – कचरा, भराव टाकून आणि बांधकामे करून शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुळा नदी पात्र बुजविले जात आहे. नदी पात्र अरूंद झाल्याने पावसाळ्यात पुराचा धोका वाढला असून जल प्रदूषण होत आहे. या प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने कारवाईचे आदेश दिल्यानंतर संबंधित यंत्रणा वठणीवर आल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रणाखाली पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीएसह समिती स्थापन करून या नद्यांबाबत आराखडा तयार करणार आहे.

नदीपात्रात मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकून अनधिकृत बांधकाम केली गेली आहेत. तसेच, ओढे व नाल्यावरही याच पद्धतीने अतिक्रमण केले गेले आहे. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या नद्यात प्रदूषण वाढून पात्र अरूंद झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढल्याने नदी काठच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्याचा फटका अनेक लोकवस्तींना बसला होता. याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारची दखल राष्ट्रीय हरित लवादाने घेतली.

लवादाने नियुक्‍त केलेल्या एका समितीने नदी पात्राची पाहणी केली. त्यात अनेक ठिकाणी नदी पात्रात राडारोडा टाकल्याचे आढळून आले. त्याची गंभीर दखल घेऊन हरित लवादाने पीएमआरडीए, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका यांना कारवाईचे आदेश दिले आहेत. नदीत पात्रातील राडारोडा तत्काळ काढून अतिक्रमणे हटविण्यासंदर्भात आठ आवठड्याच्या आत कृती आराखडा तयार करण्याचे या आदेशात म्हटले आहे. हरित लवादाने दिलेल्या आदेशानंतर या यंत्रणा वठणीवर आल्या आहेत. त्यानुसार पालिकेने पवना, इंद्रायणी व मुळा नदीसाठी आराखडा करण्यास सुरूवात केली आहे.

राडारोडा टाकणाऱ्यांविरोधात कारवाई कधी ?
पिंपरी-चिंचवडनंतर सांगली, कोल्हापूर आणि पुणे शहरात निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीनंतर नदी पात्र गिळंकृत करणाऱ्यांविरोधात पर्यावरण प्रेमींनी आवाज उठविला आहे. त्यांनी कायदेशीर लढा उभारला. परंतु, पुरात हजारो कुटुंबे उद्धवस्त झाल्यानंतर शहरी भागात नदीपात्रालगत भराव, राडारोडा टाकून नदीपात्र बुजविण्याचा उद्योग सुरूच आहे. सध्या सुरु असलेल्या निवडणुकीच्या धामधुमीचा गैरफायदा घेतला जात आहे. कृती आराखडा करत असताना तातडीने याकडे यंत्रणांनी लक्ष देण्याची गरज पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)