पुणे – करोना संक्रमणाची शक्यता कमी असणाऱ्या भागात शाळा सुरु करण्यास कुठलीही अडचण नाही. मात्र, करोनामुळे शाळा आणखी काही दिवस बंद ठेवल्या तर शाळाबाह्य विद्यार्थी वाढण्याची भीती आहे, असे राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी सांगितले.
सोमवारपासून राज्यातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. मात्र, करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे शाळा सुरू करू नये, अशी मागणी विविध संस्था संघटनांकडून होत आहे. तसेच शिक्षकांबरोबर शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची सुद्धा करोना चाचणी करून घ्यावी, असेही मत मांडले जात आहे.
यासंदर्भात विशाल सोळंकी म्हणाले, शाळा सुरू झाल्यानंतर एखाद्या शाळेमध्ये शिक्षकच करोना पॉझिटिव्ह आढळून येत असल्याचे दिसून आल्यास स्थानिक प्रशासनाने संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांची करोना चाचणी करण्याबाबत निर्णय घ्यावा. राज्यातील तब्बल पन्नास लाख विद्यार्थ्यांची करोना चाचणी करणे शक्य नाही.
राज्यातील ज्या भागामध्ये करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे; तेथे उशिरा शाळा सुरू केल्या जाऊ शकतात. परंतु, ज्या भागात काही दिवसांपासून करोना रुग्ण नाहीत. त्या ठिकाणच्या शाळा सुरू करणे उचित ठरेल. सुमारे आठ महिन्यांपासून विद्यार्थी शाळेत गेले नाहीत. आणखी काही दिवस हीच परिस्थिती राहिली तर शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू शकते.