परिस्थिती पाहून लॉकडाऊनचा निर्णय

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती

 

पुणे – राज्यात एकूण चाचण्यांमध्ये जवळपास 12 ते 13 टक्‍के रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे पुढील दहा ते पंधरा दिवसांत राज्यातील वाढत्या बाधित संख्येची काय परिस्थित असेल? हे पाहून पुढचा निर्णय घेण्यात येईल. सध्या तरी लॉकडाऊनसंदर्भात कुठलाही विचार नसून, आताच त्याबद्दल बोलून नागरिकांना पॅनिक करणार नाही, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी पुण्यात आयोजित मेळाव्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्‍त केली जात आहे. त्याचा अनुभव दिल्ली आणि केरळ येथे पहायला मिळत आहे. नुकतेच अहमदाबादमध्ये रात्रीत लॉकडाऊन जाहीर केले.

परदेशातही अनेक देशांनी पुन्हा लॉकडाऊन केले आहे. दरम्यान, राज्यात पुढील काही दिवसांत रुग्णांची संख्या किती आढळून येते? त्यावर निर्णय घेतला जाईल. राज्यातील काही जम्बो कोविड केंद्र बंद ठेवली आहेत. भविष्यात गरज पडल्यास ती पुन्हा सुरू करण्यास सज्ज आहोत. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन मास्क न वापरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

दंडाच्या रक्‍कमेत वाढ होणार नाही. मात्र, सध्याच्या परिस्थितीत नागरिकांनीच आपापली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. इयता 9 ते 12 वीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात नियमावली करण्यात आली आहे. त्यात किती विद्यार्थी बोलवावेत, शिक्षकांची चाचणी, मास्कचा वापर असे मुद्दे नमूद केले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.