काबूल – अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यापासून तेथे अल कायदा पासून इसिसपर्यंत अनेक विदेशी दहशतवादी संघटनांचा स्वैर संचार दिसायला लागला आहे. यामध्ये इस्लामिक स्टेट इन इंडियन सबकॉन्टिनेंट पासून इस्लामिक मुव्हमेंट इन उझबेकिस्तानसारख्या संघटनांचाही समावेश आहे.
त्यामध्ये इतर अनेक संघटनांच्या म्होरक्यांसह ओसामा बिन लादेनच्या मुलाचाही समावेश आहे. अल कायदा आणि इस्लामिक स्टेटच्या कारवायांबाबत संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या ताज्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
ओसामा बिन लादेनचा मुलगा अब्देल्ला हा अफगाणिस्तानमध्ये आल्याचे आणि त्याने काही प्रमुख गटांशी चर्चा केल्याचे सुरक्षा परिषदेच्या अहवालात म्हटले आहे. अब्देल्ला याचा आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीमध्ये अद्याप समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्याच्यावर सध्या तरी कोणतेच निर्बंध नाहीत. मात्र अल कायदाचे पुलर्जीवन करण्यासाठी तो प्रयत्नशील असल्याचे या अहवालातून स्पष्ट होते आहे.