इमारतीच्या छतावर साकारली सेंद्रिय शेती

नोकरी सांभाळत भाजीपाला, फुलाफळांची फुलवली बाग

बोपखेल – पिंपरी-चिंचवड शहरात शेतीची जागा आता सिमेंटचे जंगल घेत आहे. बागायत शेत जमिनींमध्ये आता टोलेजंग इमारती उभा राहत आहेत. त्यामुळे उद्योगनगरीतून आता शेती हद्दपार होताना दिसून येत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये बोपखेलमधील एका नोकरदाराने आपल्या इमारतीच्या छतावर सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वीपणे राबविला आहे. त्याची चर्चा बोपखेल परिसरात होताना दिसून येत आहे.

भारत हा कृषिप्रधान देश आहे. परंतु या कृषिप्रधान देशातून शेतीच हद्दपार होताना दिसून येत आहे. जागतिकीकरणाचे वारे व नवीन युवा पिढीचे शेती व कृषी आधारात उद्योगधंद्यांकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे शेती बिल्डर, उद्योग आदी गोष्टींसाठी विकून टाकली जात आहे. त्यामुळे शहरातील शेतीच्या जागी आता टोलेजंग इमारती उभा राहत आहेत.

गगनचुंबी इमारतींमुळे शहरातील पर्यावरणपूरक वातावरणाचा ऱ्हास होत असून स्वतः जगण्यापुरता भाजीपाला अथवा अन्नधान्य आज आपण निर्माण करू शकत नाही. परंतु अशा जागतिकीकरणाच्या वाऱ्यामध्ये देखील सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला भाजीपाला, फळे खाण्यास मिळावित यासाठी बोपखेल येथील महेश दशरथ देवकर यांनी आपल्या राहत्या घराच्या छतावर भाजीपाला, फुले तसेच घराच्या परिसरात विविध फळांची झाडे लावली आहेत.

त्यामुळे घराजवळ स्वतःला शेती नाही तसेच लहानपणापासूनच शेतीची आवड असल्याने महेश यांनी आपली नोकरी सांभाळत इमारतीच्या छतावर माती, पाणी तसेच सेंद्रिय खातांचा वापर करून शेती फुलवली आहे. त्यांच्या शेतीची बोपखेल परिसरात मोठी चर्चा ऐकण्यास मिळत आहे.

सेंद्रिय खतांचा वापर
झाडांना, फुलझाडांना तसेच पालेभाज्यांना रसायनिक खतांचा वापर केला जात नाही. घरातील कचरा, पालापाचोळा एका खड्ड्यात टाकून त्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत तयार केले जाते. त्याच खताचा वापर भाजीपाला व झाडांसाठी केला जात आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबाला भाजीपाला, फळे तसेच फुलांसाठी खर्च करावा लागत नाही. तसेच केमिकलयुक्‍त, रसायनमिश्रित पालेभाज्यांपासून आमची सुटका झाल्याचे त्यांनी सांगितले. या कामात भाऊ, भावजय, आई यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.

2015 पासून राबविला अभिनव उपक्रम
महेश यांचा हा अभिनव उपक्रम 2015 पासून अवितरपणे सुरू आहे. इमारतीच्या छतावर टोमॅटो, कांदा, बटाटा, लसून, रताळी, कारली, मिरची, भोपळा, दोडका, वाल, गवती चहा, वांगी, पालेभाज्या याबरोबरच गुलाब, झेंडूची फुले तसेच आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड त्यांनी केली आहे. त्यामध्ये लिंब, कोरपड, येरंड, अननस, पपई या सारख्या वनस्पती छतावर त्यांनी लावल्या आहेत. तर इमारतीच्या आजूबाजूला केळी, आंबा, चिकू, नारळ यांसारखी फळझाडे लावली आहेत. त्यामुळे घरातील दररोजच्या भाजीपाल्याची चिंता मिटली आहे. मी सुरू केलेल्या या उपक्रमाला घरातील सर्वजण सहकार्य करत असल्याने उपक्रम यशस्वी होऊ शकला असल्याचे दैनिक प्रभातशी बोलताना महेश यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.