कडक निर्बंध नव्हे, तर लॉकडाऊनच…

इंदापूर शहरातील व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

रेडा -जिल्ह्यातील करोनाचा उद्रेक रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंदचा निर्णय घेतल्याने व्यापाऱ्यांमध्ये सध्या संतापाची भावना निर्माण झाली आहे. सध्या शासनाने घातलेले कडक निर्बंध नव्हे; तर लॉकडाऊनच आहे, अशी भावना इंदापूर तालुक्‍यातील ग्रामीण भागातून व्यक्त होत आहे.

अचानक केलेल्या ब्रेक दि चेन या आवाहनामुळे शहरासह ग्रामीण भागातील हॉटेल व्यावसायिक, कापड व्यावसायिक, सलून, गॅरेज चालक यांच्यापुढे मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सध्या इतर व्यवसाय करोनाचे निकष पाळून चालू आहेत त्याचप्रमाणे करोना प्रतिबंधात्मक सर्व नियम घालून शासनाने चालू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी फूटवेअर विक्रेते संतोष सोनवणे यांनी व्यक्त केली आहे.

अनेक व्यापारी गरीब असून हातावर पोट असून दुकाने भाड्याची आहेत, बॅंकांची कर्जे आहेत. त्यामुळे सरकारने जाहीर केलेले लॉकडाऊन मागे घ्यावे. शनिवार, रविवारी बंद ठेवले तरी चालेल त्याचप्रमाणे सकाळी नऊ ते सहा असा आस्थापनाचा वेळ ठेवावी, ही सरकारला विनंती आहे.
– नरेंद्र गांधी, अध्यक्ष इंदापूर सराफ असोसिएशन

जीवनावश्‍यक वस्तूबरोबर इतर गोष्टींचीदेखील ग्राहकांना गरज पडते. सरकारने जाहीर केलेला दोन दिवसांसाठी बंदचा निर्णय योग्य होता; मात्र अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. सर्व व्यापारी वर्ग याचा निषेध व्यक्त करतो. त्यामुळे दोन दिवसांचा निर्णय कायम ठेवावा ही मागणी आहे.
 – नंदकुमार शहा,
अध्यक्ष इंदापूर शहर व्यापारी संघटना.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.