ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फायनान्स कंपन्यांकडून अनेक प्रस्ताव सादर केले जातात आणि ते प्रस्ताव ग्राहकांच्या पसंतीला पडत असल्याचे एकंदरित चित्र आहे. बहुतांश फायनान्स कंपन्यांचे नियम हे बॅंकेप्रमाणेच असल्याची जाणीव नागरिकांना झाली आहे. गृहकर्ज देण्याच्या प्रक्रियेतही पारदर्शकता असल्याने गेल्या काही वर्षापासून फायनान्स कंपन्या आणि बॅंका यांच्यातील अंतर कमी होत चालले आहे.
‘पर्याय फायनान्स कंपन्यांचा’ (भाग-१)
बॅंक आणि फायनान्स कंपनीतील अंतर
हौसिंग फायनान्स कंपन्यांकडून ग्राहकांना अधिक सवलत आणि मूभा दिली जाते. एकीकडे बॅंका 40 वर्षापेक्षा अधिक वयाच्या ग्राहकांना दीर्घकाळासाठी कर्ज देण्याबाबत सजगता पाळतात, त्याचवेळी हौसिंग फायनान्स कंपन्या अशा मंडळींसाठी 25 वर्षांपर्यंत कर्ज देतात. कारण फायनान्स कंपन्यांच्या मते, वयाची साठी ओलांडली तरी कोणताही नागरिक काम करू शकतो. निवृत्तीनंतर संबंधित व्यक्तीला निवृत्ती वेतन, ग्रॅच्यूटी आदी पैसा मिळतो. या गोष्टींचा देखील फायनान्स कंपन्या विचार करतात.
कर्जाचे आकलन करताना हौसिंग फायनान्स कंपन्या जमीन तसेच बांधकामाचा खर्च याशिवाय स्टॅंप ड्यूटी, रजिस्ट्री याचाही समावेश करतो. बॅंकत मात्र या गोष्टीचा विचार केला जात नाही.
फायनान्स कंपन्या पॉप अप सुविधा देखील ऑफर करतात. सुरवातीच्या काळात हप्ता कमी राहिल आणि कालांतराने तो वाढत जाईल, अशी तरतूद या ऑफरमध्ये असते. दरवर्षी वेतनात काही ना काही वाढ होईल, असे गृहित धरून हप्त्याचे नियोजन केले जाते. फायनान्स कंपन्यांचा प्रमुख उद्देश हा गृहकर्ज देणे हाच असतो. त्यामुळे त्यांचे गृहकर्ज क्षेत्रावरच अधिक लक्ष केंद्रीत असते. तर बॅंकांकडे गृहकर्जाशिवाय अन्य पर्यायी सेवा असल्याने तेथे कर्जप्रकरणांचा निपटारा लवकर होत नाही. म्हणूनच फायनान्स कंपन्यांकडून कर्जाची प्रक्रिया लवकर होते आणि कमी कागदपत्रात गृहकर्ज मिळवणे सोपे जाते.
गृहकर्जावरील व्याज
बहुतांश हौसिंग फायनान्स कंपन्या कर्जावरील व्याजदर हे ग्राहकाच्या उत्पन्नाच्या स्थितीवरून निश्चित करतात. नोकरदार वर्गांना परवडणारे व्याजदर असते. तसेच लहान आणि छोट्या व्यावसायिकांसाठीचे व्याजदर हे तुलनेने अधिक असू शकतात. फायनान्स कंपन्यांकडून महिलांसाठी देखील विशेष योजना असतात. याप्रमाणे व्याजदरात काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. आजमितीला ढोबळपणे बॅंकांचे व्याजदर नऊ टक्क्याच्या आसपास असताना फायनान्स कंपन्याचे व्याजदर हे दहा ते अकरा टक्क्यांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. यात बदल असू शकतो.
– प्रियांका जाधव