मालमत्तेत गुंतवणूक करा; पण… (भाग-१)
याकडे लक्ष ठेवा
मालमत्तेत स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ठिकाणांवर, जागेवर मालमत्तेची किंमत ठरत असते. त्यामुळे चांगल्या ठिकाणी जागा खरेदी करण्याबाबत आपण आग्रही असावे. निर्माणधीन प्रकल्पातील योजनेत गुंतवणूक करण्याला प्राधान्य द्या. जर आपण निवासी प्रकल्पात गुंतवणूक करत असाल तर फ्लॅट खरेदीला प्राधान्य द्या. नामांकित विकासकाच्या योजनेत गुंतवणूक करणे हिताचे ठरेल. कारण कालांतराने त्याच्या नावाचा, जागेचा आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. रेडी पझेशनच्या मालमत्तेचा जेव्हा विचार होतो, तेव्हा बाजारातील काही घटक स्थिर राहतात. त्यामुळे फायदा मिळवण्याची संधी नेहमीच राहते.
गुंतवणूक सुरक्षित ठेवण्यासाठी
मालमत्ता किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करताना या क्षेत्रातील अडचणी जाणून घ्यायला हव्यात. वास्तविकपणे एखादा अनुभवहिन गुंतवणूकदार हा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करत असेल तर तेथे नुकसान होण्याची शक्यता देखील असते. त्यामुळे मालमत्तेत गुंतवणूक करताना पुरेसा विमा आहे की नाही, याची खातरजमा करून घ्यावी.
मालमत्तेत गुंतवणूक करणारे साधारणत: दोन मुख्य घटक आहेत.एंड यूजर्स स्वत:साठी मालमत्ता खरेदी करणारे आणि शुद्ध गुंतवणूकदार. एंड यूजर्सला काही बाबतीत गुंतवणूकदारही म्हटले जावू शकते. काही गुुंतवणूकदार अशा मालत्तेतून फायदा कमावण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच त्याठिकाणी ते स्वत: राहतात आणि त्यातील एक भाग भाड्याने दिला जातो. तसेच कालांतराने त्याची विक्री देखील केली जाते. अँड यूजरकडून मालमत्ता विक्री ही साधारण बाब मानली जाते. प्रत्येकवेळी मालमत्ता विक्रीतून फायदा कमावणे हाच उद्देश नसतो. कधी कधी मालमत्ता विक्रीतून मोठी मालमत्ता खरेदी करणे किंवा सध्याच्या घराबाबत समाधानी नसेल तर नवीन घर खरेदीसाठी मालमत्तेची विक्री केली जाते. याशिवाय मालमत्ता विक्रीचे कारणही अनेक असू शकतात. काहीवेळा गरज भागवण्यासाठी मालमत्ता विकावी लागते. अशावेळी किंमतीचा फारसा विचार होत नाही. शेवटी मालमत्ता विक्रीतून होणारा फायदा हा मालमत्तेच्या वयावर अवलंबून असतो.
– कमलेश गिरी