पिंपरी, (प्रतिनिधी) – आरटीअंतर्गत स्वयंअर्थ सहाय्यित इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र या शाळांचा काही भागासाठीच पर्याय दिसत आहे. उर्वरित भागातील शाळांचा देखील पर्याय खुला करण्यात यावा अशी मागणी पालकांमधून होत आहे.
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवर अर्ज भरण्यास १६ एप्रिलपासून सुरूवात झाली आहे. पालकांना आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरत असताना केवळ सरकारी व अनुदानित शाळांची यादीचा पर्याय येत होता. शिक्षण विभागाच्या या कारभारावर पालक नाराजी व्यक्त करत होते. ३० एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.
मात्र इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा पर्याय नसल्याने अनेकांनी पालकांनी अर्ज भरण्याकडे दुर्लक्ष केले होते. पालकांना एक किलोमीटरच्या अंतरावर अनुदानित सरकारी शाळा उपलब्ध असल्यास पालकांना स्वयंअर्थसहाय्यित निवडीसाठी उपलब्ध नसेल व स्वयंअर्थसहाय्यित शाळा उपलब्ध नाही असा संदेश दिसत आहे.
रावेतमधील डीवाय पाटील, कल्पना इंग्लिश मीडियम स्कूल, जीएसके इंग्लिश मीडियम स्कूल, सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल, मोरवाडीमधील एसएनबीपी स्कूल, चर्हराली किड्स पॅराडाईज, कासारवाडीतील इंन्फट जीजस, रहाटणीतील डेलमॉटस वाकडमधील एसपी स्कूल, पिंपळे गुरवमधील किलबिल स्कूल, काळेवाडीतील बीटी मेमोरिअल इंग्लिश मीडियम स्कूल अशा अनेक ठिकाणी शाळा दिसून येत आहेत.
विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा नसतील व एक किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर स्वयंअर्थसहाय्यित शाळा असेल; तर अशा परिस्थितीत त्या स्वयंअर्थसहाय्यित शाळेत मुलांना २५ टक्के प्रवेशांतर्गत प्रवेश दिला जाणार आहे.
अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थ्यांना निवासस्थानापासून १ किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व स्वयंअर्थसहाय्यित शाळा नसेल; तर विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून ३ किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरील शाळांमध्ये प्रवेश उपरोक्त प्राधान्यक्रमाने होतील, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.