मुझफ्फराबाद, (पाक व्याप्त काश्मीर): आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त पाक व्याप्त काश्मीरमधील नागरिकांनी आज पाकिस्तान सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. नीलम नदीवरील जलविद्युत प्रकल्पासाठी झेलम नदीचे पाणी वळवण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयाविरोधात यावेळी आंदोलन करण्यात आले. नदीचे पाणी वळवण्याबाबत पाकिस्तानातील जल आणि उर्जा प्राधिकरणाने (वापडा) घेतलेल्या निर्णयाविरोधात गेल्या 72 दिवसांपासून पाक व्याप्त काश्मीरमधील नागरिक आंदोलन करत आहेत.
नीलम नदीचे पाणी पाकिस्तान सरकारने जेंव्हा वळवले, तेंव्हाच पाक सरकारने दिलेले आश्वासन पाळले गेले नव्हते. आता जर झेलम नदीचे पाणीही वळवले गेले तर मुझफ्फराबाद शहर अगदी कोरडे पडेल, अशी टीका “पीओके’तील नागरिकांनी केली आहे. झेलम नदीच्या पाण्याची पातळी आंतरराष्ट्रीय निकषांनुसार कायम रखली जावी, अशी मागणीही व्याप्त काश्मीरमधील नागरिक करत आहेत.
पाकिस्तान सरकारकडून नदीकाठच्या पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास केला जातो आहे. त्यामुळे आता पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी पाकिस्तान सरकारने काम केले पाहिजे, असेही या नागरिकांनी म्हटले आहे.
नीलम नदीवरील जलविद्युत प्रकल्पामुळे या परिसरातील पर्यावरणाची मोठी हानी झाल्याची टीका होत आहे. आता झेलम नदीवर कोहला येथे जलविद्युत प्रकल्पाची उभारणी केली जात आहे.