पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यावर्षीच्या शैक्षणिक वर्षातील पहिल्या सत्र परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले, परंतु महाविद्यालयामार्फत ते अर्ज विद्यापीठाकडे प्राप्त झाले नाहीत. तसेच ज्यांनी अर्ज केले नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी वेळेत परीक्षा अर्ज करावे, असे आवाहन विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने केले आहे.
विद्यापीठ व महाविद्यालयाच्या पहिल्या सत्र परीक्षेसाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर 2021 मध्ये अर्ज करण्याचे सूचित केले होते. अशा विद्यार्थ्यांची परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये पूर्ण होत आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले आहेत, परंतु काही कारणास्तव महाविद्यालयाने इनवर्ड केलेले नाहीत आणि ज्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरावयाचे राहून गेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी मिळावी, अशी मागणी युक्रांदसह अन्य विद्यार्थी संघटनांनी केली होती. त्यानंतर आता अशा विद्यार्थ्यांना दि. 8 ते 18 एप्रिल या कालावधीत ऑनलाइन प्रणालीद्वारे परीक्षा अर्ज भरण्यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात येत आहे, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी सांगितले.
महाविद्यालयांनी प्राप्त झालेले परीक्षा अर्ज विनाविलंब 19 ते 20 एप्रिल या कालावधीपर्यंत इनवर्ड करावेत. या विद्यार्थ्यांची परीक्षा अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा होणार आहे. तसेच महाविद्यालयांनी अशा विद्यार्थ्यांच्या अंतर्गत, प्रात्यक्षिक, मौखिक इत्यादी परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार संगणक प्रणालीद्वारे गुण भरावेत, अशा सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत. पहिल्या सत्र परीक्षेसाठी ज्यांनी परीक्षा अर्ज केले नाहीत, त्यांची परीक्षा होणार आहे. ही बाब महाविद्यालयातील सर्व घटकांनी विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्यावी आणि विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज मुदतीत भरण्यासाठी सूचना कराव्यात, असेही परीक्षा विभागाने म्हटले आहे.