पुणे – महापालिकेच्या ड्रेनेज विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे अवघ्या दोन महिन्यांपूर्वी नव्याने दुरूस्त केलेला लक्ष्मी रस्ता अवघ्या चार महिन्यांपूर्वी डांबरीकरण केल्यानंतर पुन्हा ड्रेनेजच्या कामासाठी खोदला आहे. पथ विभागाने गेल्या सहा महिन्यांत या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तब्बल 45 लाखांचा खर्च केल्याचे समोर आले आहे. महापालिकेने 26 जानेवारीला या रस्त्यावर मोठा-गाजा करत पादचारी दिन साजरा केला होता. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच हा रस्ता पुन्हा खोदला आहे. या अनागोंदीला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.
शहरातील मध्यवर्ती पेठांचा भाग असलेल्या लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, शिवाजी रस्ता परिसरातील सांडपाणी वाहिन्या सुमारे 30 ते 40 वर्षे जुन्या तसेच कमी वहन क्षमतेच्या होत्या. त्यामुळे करोनाच्या दुसऱ्या लाटेचे कारण पुढे करत या सांडपाणी वाहिन्या बदलण्याचे मार्च 2021 मध्ये हाती घेतले. त्यानंतर पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र, ऐन पावसाळ्यात करोनाची तिसरी लाट नियंत्रणात आली असली तरी हे सांडपाणी वाहिन्या बदलण्याचे काम अर्धवटच होते. त्यामुळे जवळपास आठ ते नऊ महिने पेठांमधील नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. तसेच, पालिकेवर टीका झाली. त्यानंतर डिसेंबर 2021 ला पादचारी दिन साजरा करण्यात आला. त्यासाठी संपूर्ण लक्ष्मी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले, तसेच रस्ता पूर्ववत करण्यात आला होता.
45 लाखांचा खर्च पाण्यात
लक्ष्मी रस्त्यावरील ड्रेनेजचे काम पूर्ण झाल्यानंतर पथ विभागाने या विभागाकडे काम पूर्ण झाल्याबाबत विचारणा करून लक्ष्मी रस्ता दुरूस्त करण्याचे काम हाती घेतले. त्यानंतर डांबरीकरण तसेच इतर रस्त्याची कामे करण्यासाठी पथ विभागाने जवळपास 45 लाख रुपयांचा खर्च केला. त्यानंतर पुन्हा खोदाई होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, त्यानंतर लगेचच मार्चच्या अखेरीस पुन्हा लक्ष्मी रस्ता अनेक ठिकाणी ड्रेनेज वाहिन्यांसाठी खोदला आहे. पथ विभागाने या खोदाईस आक्षेप घेतला मात्र हे काम केल्याशिवाय पर्याय नसल्याचे पथ विभागास सांगण्यात आले. तसेच खोदाईनंतर रस्ता दुरूस्त करण्यासाठी ड्रेनेज विभाग निधी देण्यास तयार असल्याचे प्रशासकीय पातळीवर दाखविण्यात आले.
लक्ष्मी रस्त्यावर ड्रेनेज तसेच पाणीपुरवठा विभागाची खोदाई सुरू होती. हे काम पूर्ण झाल्याची विचारणा या दोन्ही विभागांना करूनच लक्ष्मी रस्त्याचे डांबरीकरण तसेच इतर आवश्यक कामे पूर्ण करण्यात आली होती.
– व्ही.जी कुलकर्णी, पथ विभाग प्रमुख