शिक्रापूर – यापूर्वी केलेल्या विकासकामांच्या जोरावर वॉर्ड क्रमांक दोनमधील शिक्रापूर ग्रामविकास आघाडी पॅनलच्या सर्व उमेदवारांना मतदार संधी देतील असा विश्वास घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अरुणदादा करंजे यांनी व्यक्त केला. करंजे यांच्या अभ्यासू वृत्तीच्या वक्तव्याने उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
शिक्रापूर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दोन पॅनलमध्ये सरळ लढत होत आहे. यामध्ये गावातील शिक्रापूर ग्रामविकास आघाडी पॅनलच्या माध्यमातून वॉर्ड क्रमांक दोनमधून गौरीताई दत्तात्रय राऊत, रेखाताई सचिन मांढरे व गौरव अरुणदादा करंजे हे तिघे अधिकृत उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
या उमेदवारांचा प्रचार सुरु असताना अरुणदादा करंजे म्हणाले, यापूर्वी मागील पंचवार्षिकमध्ये सध्याचे उमेदवार गौरव करंजे हे वॉर्ड क्रमांक तीनमधून ग्रामपंचायत सदस्य असताना त्यांनी तेथील रस्ते, लाईट, गटार, यांसह आदी समस्या सोडविण्याचे काम केले आहे. वॉर्डातील काही महत्वाची कामे गौरव करंजे यांनी स्वखर्चाने केलेली असून येथील एका भागामध्ये पावसामुळे जमा होणाऱ्या पाण्याची मोठी समस्या सोडविण्यासाठी स्वतःची जागा देऊ केली.
लवकरच ते काम पूर्ण होणार आहे. यापूर्वी गावातील समस्यांचा आढावा घेत असताना गावातील वॉर्ड क्रमांक दोनमध्ये असंख्य समस्या असल्याचे निदर्शनास आले आहे. पूर्वीपासून समाजकारणाची आवड असणाऱ्या करंजे घराण्यातील गौरव करंजे यांनी हा वॉर्ड निवडला असल्याचे अरुणादादांनी सांगितले.
वॉर्ड क्रमांक दोन हा आव्हानात्मक असून गौरव यांच्या बरोबर असलेले गौरीताई राऊत व रेखाताई मांढरे हे दोन्ही उच्चशिक्षित उमेदवार समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहेत. स्वतः गौरव करंजे हे उच्चशिक्षित असल्याने त्यांना तहसीलदार, प्रांत, तलाठी, पोलीस स्टेशन यांसह आदी शासकीय कार्यालयातील सर्व माहिती व शासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क आहे.
त्यांना इंडस्ट्रीज विभागाचा अनुभव असल्याने त्याचा फायदा या भागातील कामगार व सर्वसामान्य नागरिकांना होणार असल्यामुळे कामगार व मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. गौरव करंजे यांनी यापूर्वी केलेल्या कार्यामुळे तसेच करंजे घराण्याच्या गावासाठी असलेल्या योगदानामुळे शिक्रापूर ग्रामविकास आघाडी पॅनलचे सर्व उमेदवार विजयी होणारच असल्याचा दावा अरुणदादा करंजे यांनी केला आहे. असाच आशावाद शिक्रापूर ग्रामविकास आघाडी पॅनलच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.