उत्तरा भोसले यांचे धोंडेवाडी येथे महिला मेळाव्यात आवाहन
कराड – विरोधक फक्त प्रसिद्धी करतात, पण जनतेसाठी वास्तवात काही करत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोककल्याणाच्या अनेक योजना राबविल्या आहेत. या सर्व योजना तळागाळात पोहचविल्या आहेत.
मोदी सरकार व फडणवीस सरकारच्या योजनांचा लाभ विशेषत: महिलांना मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे महिलांनी भाजपा सरकारला भक्कम पाठबळ देण्यासाठी महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले व डॉ. अतुल भोसले यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन कृष्णा महिला उद्योग समुहाच्या संस्थापिका उत्तरा भोसले यांनी केले.
महायुतीचे उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ धोंडेवाडी ता. कराड येथील राजहंस मंगल कार्यालयात आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. भाग्यलक्ष्मी महिला बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी मोहिते, विजया सूर्यवंशी, जयश्री पाटील, राधा निकम, वैशाली भोसले, वंदना साळुंखे, मंदाकिनी यादव यावेळी उपस्थित होत्या.
त्या म्हणाल्या, सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 25 वर्षांपूर्वी महिलांसाठी काम करणारी सामाजिक संस्था उभारली. या संस्थेच्या माध्यमातून आम्ही समाजसेवेचा वारसा चालवत आहोत. या संस्थांच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण यासह रोजगाराची मोठ्या प्रमाणावर निर्मिती आम्ही केली आहे. फारसा गाजावाजा न करता हे सामाजिक कार्य अव्याहतपणे चालू आहे. यावेळी लक्ष्मी मोहिते यांनी अतुल भोसले यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याची ग्वाही दिली.