साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमला पॉलला मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. केरळमधील एर्नाकुलम येथील तिरुवैरानिकुलम महादेव मंदिरात अधिकाऱ्यांनी तिला प्रवेश नाकारल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. ‘धार्मिक भेदभावामुळे’ तिच्यासोबत असे करण्यात आल्याचा आरोप अमला पॉलने केला आहे.
अमला पॉल सोमवारी दर्शनासाठी मंदिरात पोहोचली होती, परंतु मंदिराच्या अधिकाऱ्यांनी तिला भेट देण्यास नकार दिला. प्रथेचे कारण देत अभिनेत्रीला मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तिला सांगण्यात आले की, मंदिर परिसरात फक्त हिंदूंनाच प्रवेश आहे.
मंदिरात प्रवेश न मिळाल्याने तिला मंदिरासमोरील रस्त्यावर उभे राहून देवीचे दर्शन घ्यावे लागले, असा दावा अमला पॉलने केला आहे. मंदिराच्या व्हिजिटर रजिस्टरमध्ये अभिनेत्रीने तिचा अनुभव शेअर केला. तिने लिहिले,’देवीचे दर्शन न करताही जावे लागले.’
अभिनेत्रीने असेही लिहिले,’हे खूप दुःखद आणि निराशाजनक आहे की 2023 मध्येही धार्मिक भेदभाव अजूनही कायम आहे. मी देवीच्या जवळ जाऊ शकत नाही, पण मला आशा आहे की धार्मिक भेदभावात लवकरच बदल होईल. अशी वेळ देखील येईल जेव्हा आपल्या सर्वांना धर्माच्या आधारावर नव्हे तर समानतेने वागवले जाईल.’