पुणे: मराठी साहित्यक्षेत्रातील अनमोल लेणे असलेल्या प्रतिभावान कवी ग्रेस अर्थात माणिक गोडघाटे यांचा जन्मदिन रविवार, दि. 10 मे रोजी साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त “महाकवी ग्रेस ग्रुप’ने ग्रेस यांच्याच कवितांचे “चांदणे तुझ्या स्मरणाचे’ या नावाने ऑनलाईन काव्यवाचन आयोजित केले असून त्यासाठी ग्रेसप्रेमींनी कवी ग्रेस यांची कोणतीही एक कविता स्वत:च्या आवाजात व्हिडीओ रेकॉर्डींग करुन 9403047646 या व्हॉट्सऍप क्रमांकावर पाठवण्याचे आवाहन केले आहे.
सध्या कोव्हिड19 चा कहर सुरु असल्याने ग्रेस यांच्या आठवणी जागवणे आणि त्यांच्या कविता तसेच ललितलेखनाचा आनंद घेण्यासाठी जाहीर कार्यक्रम करणे अशक्य आहे. त्यामुळे या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे “महाकवी ग्रेस ग्रुप’च्या वतीने सांगण्यात आले आहे. यावर्षीचा सातारा येथे होणारा 20 वा “गुलमोहर डे’सुद्धा ऑनलाईन अर्थात व्हर्च्युअल पद्धतीने साजरा करण्यात आला. त्यामुळे ग्रेस यांच्या कवितांवर आधारित “चांदणे तुझ्या स्मरणाचे’ हा कार्यक्रमही ऑनलाईन घ्यायचा, असे ठरवण्यात आले. या उपक्रमासाठी इच्छुकांनी ग्रेसच्या एका कवितेचा, 2 ते 3 मिनिटांचा व्हिडीओ पाठवण्याचे आवाहन करण्यात आले असून, हे सर्व व्हिडीओ एकत्रित करुन हा एकचएक व्हिडीओ 10 मे रोजी सायंकाळी युट्युबवर अपलोड केला जाणार आहे.
ग्रेस यांच्या “संध्याकाळच्या कविता,’ “चंद्रमाधवीचे प्रदेश’, “सांध्यपर्वातील वैष्णवी’ तसेच “सांजभयाच्या साजणी’ अशा विविध कवितासंग्रहांनी मराठी साहित्यात आपले एक स्वतंत्र स्थान आणि विशिष्ट वाचकवर्ग तयार केला आहे. तसेच त्यांचे ललितलेखनही समृद्ध असून त्यांच्या “वाऱ्याने हलते रान…’ या ललितलेखनाला साहित्य अकादमी पुरस्कारही मिळालेला आहे.