Onion prices – सध्या देशाच्या अनेक भागात कांद्याचे दर चढेच राहिले आहेत. आजही कांद्याचे भाव सरासरी ५७ रूपये प्रति किलो इतके आहेत. तथापि जानेवारीपर्यंत हे दर ४० रुपये प्रति किलोग्रॅमच्या खाली जाण्याची सरकारची अपेक्षा आहे, असे ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात दिल्लीत कांद्याची किरकोळ विक्री किंमत ८० रुपये प्रति किलोच्या पुढे गेल्याने सरकारने तातडीने कांदा निर्यातीवर बंदी घातली. त्यानंतर हे भाव आता आटोक्यात यायला सुरूवात झाली आहे असे रोहितकुमार सिंग म्हणाले. जानेवारी पर्यंत हे दर ४० रूपयांपेक्षाही खाली येतील असे ते म्हणाले.
निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे त्या विषयी विचारले असता ते म्हणाले की, निर्यातबंदीचा शेतकऱ्यांवर परिणाम होणार नाही आणि हा व्यापार्यांचा एक छोटा गट आहे जो भारतीय आणि बांगलादेशातील बाजारातील किमतींमधील फरकाचा गैरफायदा घेत असतो. जे व्यापारी हा गैरफायदा घेत होते त्यांना कांदा निर्यात बंदीचा तोटा होईल पण ग्राहकांना मात्र त्याचा लाभच होईल असे ते म्हणाले.
सध्या सुरू असलेल्या खरीप हंगामात कांद्याची आवक कमी झाल्याच्या बातम्यांमुळे कांद्याचे भाव वाढू लागले होते. पण आता निर्यात बंदीमुळे त्या वाढीला आळा बसला आहे.