पुणे – लांबलेल्या पावसामुळे नवीन कांद्याचे झालेले नुकसान…जुन्या कांद्यांची घटलेली आवक…यामुळे मार्केट यार्डात मागणीच्या तुलनेत कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे घाऊक बाजारात नवीन कांद्याला किलोस 70 ते 90 रुपये, तर जुन्या कांद्याला 100 ते 130 रुपये भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात 150 ते 160 किलो भावाने काद्यांची विक्री होत आहे. त्यामुळे कांदा सर्वसामान्यांच्या ताटातून गायब झाला आहे. हॉटेलातही कांद्याऐवजी काकडी देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डात मंगळवारी जुना आणि नवीन कांद्याच्या एकुण 30 ते 40 गाड्यांची आवक झाली. नवीन कांद्याचा हंगाम सुरू झाला असला, तरी अवेळी झालेल्या पावसामुळे कांद्याच्या प्रतवारीवर परिणाम झाला. खराब, दर्जाहिन नवीन कांदा बाजारात येत आहे. तर, दुसरीकडे जुन्या कांद्याचा साठा संपत आला आहे. त्यामुळे जुन्या कांद्याची नगण्य आवक होत आहे.
मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक अपुरी पडत असल्याने मंगळवारी घाऊक बाजारात कांद्याचे भाव कडाडल्याचे व्यापारी रितेश पोमण, गणेश यादव यांनी सांगितले.
नवीन कांदा आणि जुन्या कांद्याची आवक पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातून झाली आहे. ‘नवीन कांद्याचा हंगाम सुरू झाला असली तरी कांद्याची प्रतवारी तितकीशी चांगली नाही. मात्र, कांद्याची आवक अपुरी पडत असल्याने नवीन कांद्याचे भाव तेजीत आहेत,’ अशी माहिती मार्केटयार्डातील कांदा व्यापारी गणेश यादव यांनी दिली. पोमण म्हणाले, “नवीन कांद्याची आवक साधारपणपणे दीड महिना सुरू राहिल. त्यानंतर पुढील वर्षी ऑगस्ट महिन्यात जुन्या कांद्याचा हंगाम सुरू होईल.’
घाऊक बाजारात कांद्याचे भाव वाढले आहेत. त्यावर आकारण्यात येणाऱ्या आडतचा विचार करता किरकोळ व्यापाऱ्यांना खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. परिणामी, नवीन कांद्याची प्रतिकिलो 100 रुपये भावाने विक्री करण्यास सुरुवात केली आहे. जुना कांद्याची विक्री 150 ते 160 रुपये भावाने करण्यात येत आहे. पुढील एक महिनाभर कांद्याचे दर तेजीत राहतील. नवीन कांदा ओलसर आहे. त्याची प्रतवारी चांगली नाही. नवीन कांद्याचे एक पोती खरेदी केल्यानंतर त्यात साधारणपणे पाच ते सहा किलो कांदा खराब निघतो.
– प्रकाश ढमढेरे, किरकोळ भाजीपाला विक्रेते