पुणे – सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उभारण्यात येणारा उड्डाणपूल एक मजलीच उभारला जाण्याची शक्यता आहे.
महिनाभरापूर्वी या पुलाचे भूमिपूजन करताना “हा पूल दुमजली करावा,’ अशा सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केल्या होत्या. यासाठी मलेशियन तंत्रज्ञान वापरण्याच्या सूचनाही गडकरी यांनी दिल्या होत्या. पण, यामुळे पुलाच्या खर्चात तब्बल 25 कोटी रुपये वाढ होणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा पूल नियोजनाप्रमाणे एकमजली होण्याची शक्यता आहे.
सिंहगड रस्त्याला कोणताही पर्यायी मार्ग नाही. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिकेने राजारामपूल ते फनटाइम सिनेमागृहापर्यंत उड्डाणपूल प्रस्तावित केला आहे. या पुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमात गडकरी यांनी दुमजली पूल उभारण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार, महापालिकेने संबंधित सल्लागार कंपनीला सध्याचा आराखडा, मेट्रोची अलाइनमेंट व खर्चाचा तपशील पुरवला. या प्रस्तावाचा अभ्यास केल्यानंतर या रस्त्यावर 118 कोटी रुपयांमध्ये दुमजली उड्डाणपूल बांधणे शक्य नाही. तसेच मलेशियन तंत्रज्ञान याठिकाणी उपयुक्त होणार नाही. असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे, महापालिका प्रशासन तसेच पालिका पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीतही उड्डाणपुलाचा खर्च वाढत असल्याने पालिकेने प्रस्तावित केलेल्या पुलाचे कामच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, पुलाचे काम देण्यात आलेल्या ठेकेदार कंपनीकडून मातीच्या तपासणीचे काम पुढील आठवड्यात सुरू केले जाणार असून त्यानंतर लगेच पुलाचे काम सुरू केले जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, गडकरी यांनी दिलेल्या प्रस्तावाबाबत महापालिका पदाधिकाऱ्यांनी मात्र अजूनही बाजू मांडलेली नाही. त्यामुळे पुलाचे काम नेमके कसे होणार आणि कधी सुरू होणार याबाबत प्रश्न आहेत.