पुणे – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात पुणे विद्यापीठ चौकातील ड्रेनेज, पाणी, वीजवाहिन्यासह उपयुक्त सेवावाहिन्या स्थलांतरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर मेट्रोचे खांब टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. दरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पर्यायी मार्गांची पाहणी पीएमआरडीए, पोलीस, महापालिका आणि टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. येत्या दोन दिवसात प्रायोगिक तत्त्वावर त्यांची अंमलबजावणी सुरू करावी. त्यामध्ये काही त्रुटी आढळून आल्यानंतर आवश्यक त्या सुधारणा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
या प्रकल्पासाठी पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल एक वर्षांपूर्वीच पाडण्यात आला आहे. त्यामुळे सेनापती बापट रस्ता, औंध, बाणेर येथून विद्यापीठ चौकात येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे या उड्डाणपुलाचे काम कधी सुरु होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या चौकाची पाहणी नुकतीच पीएमआरडीएचे अधिकारी, पोलीस प्रशासन यांनी एकत्रित पाहणी केली. लवकरच मेट्रो प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. प्रकल्पाचे काम सुरू केल्यानंतर चौकातील वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी पर्यायी वाहतूक मार्गांची पुन्हा पाहणी करण्यात आली.