श्रीगोंदा – जमिनीच्या वादाबाबत चर्चा सुरू असताना आरोपी जयदीप दत्तात्रेय सुरमकर याने संतोष ऊर्फ लाला गायकवाड यांच्यावर पिस्तूलमधून सहा गोळ्या झाडल्याचा गंभीर प्रकार मंगळवारी (दि. 10) सायंकाळी तालुक्यातील चिंभळे शिवारात घडला. यामध्ये संतोष गायकवाड गंभीर जखमी झाले असून, या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास जखमी संतोष गायकवाड व आरोपी जयदीप सुरमकर हे तालुक्यातील चिंभळे येथील एका हॉटेलमध्ये बसले होते. त्यांच्यामध्ये जमिनीच्या वादाबाबत चर्चा सुरू होती. या वेळी जयदीप सुरमकर याने संतोष गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. जखमी झालेले गायकवाड रस्त्याने पळून जात असताना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पुन्हा गोळ्या झाडल्या. जयदीप सुरमकर याने एकूण सहा गोळ्या झाडल्या, त्या सर्व सहा गोळ्या संतोष गायकवाड यांना लागल्या. यामध्ये संतोष गायकवाड हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी सुनील राजू गायकवाड (वय 30, रा. चिंभळे, ता. श्रीगोंदा) यांच्या फिर्यादीवरून जयदीप सुरमकर यांच्याविरुद्ध बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मोहन गाजरे पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, या प्रकरणाला आर्थिक देवाणघेवाणीची किनार असण्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात पुढे येत आहे. अद्याप आरोपी पोलिसांच्या हाती लागला नसून पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी दौंड, पुणे, शिरूर आणि पनवेल या भागावर लक्ष केंद्रित केले आहे.
आरोपीच्या शोधासाठी बेलवंडी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची दोन स्वतंत्र पथके केली आहेत. ही पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना झाली आहेत.
– संजय ठेंगे, पोलीस निरीक्षक, बेलवंडी.