पुणे – शहरातील आर्थिक दुर्बल घटकांमधील महिला, शालेय विद्यार्थी, दिव्यांग, कचरा वेचक, गुणवंत विद्यार्थी, बेरोजगार, तसेच मागासवर्गीयांसाठी महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांसाठी अर्ज करण्यासाठी एक महिन्याची मुदवाढ देण्यात आली आहे. या योजनांसाठीच्या कागदपत्रांची संख्या मोठी असल्याने तसेच ती मिळताना अनेक शासकीय विभागांची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने या अर्जांसाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्याची मागणी राष्ट्रवादी अर्बन सेलचे अध्यक्ष नितीन कदम यांनी केली होती.
या योजनांमध्ये तब्बल 20 योजनांचा समावेश होता. योजनांसाठी पालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकात पाच टक्के निधी राखीव ठेवला जातो. मात्र, हा निधी खर्ची पडत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यंदा देखील महापालिकेकडून या योजनांचा लाभ घेण्यासाठी 25 जुलै रोजी जाहीर प्रकटन देऊन 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविले होते. मात्र या कालावधीत अत्यंत कमी अर्ज प्राप्त झाले असल्याचे सांगत ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचे समाज विकास विभागाकडून सांगण्यात आले.