शिक्रापूर (वार्ताहर)- सणसवाडी (ता. शिरूर) येथील कंपनीमध्ये काम करणाऱ्या दामोदर कृष्णा जबल या कामगाराचा प्रेमप्रकरणातून झालेल्या वादातून सुपरवायझरने चाकूने भोकसून खून केला होता. त्याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
संतोष शहाजी राठोड असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. सणसवाडी येथे मुलीच्या प्रेम प्रकरणातून दामोदर कृष्णा जबल (रा. सणसवाडी ता. शिरूर, मूळ रा. धारावी मुंबई) या कामगाराचा सुपरवायझर संतोष शहाजी राठोड (रा. येडशी, जि. उस्मानाबाद) याने प्रेमप्रकरणातून झालेल्या वादातून दि. २० ऑगस्ट २०१८ रोजी चाकूने भोकसून खून केला होता. त्यांनतर राठोड फरार झाला.
तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक मनोज निलंगेकर, अनिल जगताप, योगेश नागरगोजे यांनी उस्मानाबाद येथून राठोड याला अटक केली होती. दरम्यान, तपासात पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार व दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर, पोलीस उपनिरीक्षक रज्जाक शेख, विद्याधर निचित, आकाश पवार, हवालदार सचिन भागवत, प्रफुल्ल सुतार यांनी आरोपीबाबत योग्य पुरावे न्यायालयात सादर केले.
सरकारी वकील प्रमोद बोंबटकर, राजेश कावेडिया यांनी पुणे येथील जिल्हा सत्र न्यायालयात बाजू मांडली. न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी सरकारी वकील व पोलीस अधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेत संतोष शहाजी राठोड याला खून प्रकरणात दोषी ठरवत जन्मठेप व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.