ओझर (वार्ताहर)- शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) या ठिकाणी ग्रामदैवत श्री भैरवनाथ व जोगेश्वरी मात्रा यात्रेनिमित्त दि. 1 ते 8 एप्रिलदरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री भैरवनाथ अखंड हरिनाम सप्ताह ग्रामस्थ मंडळ, भैरवनाथ क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व ग्रामस्थ मंडळींच्या वतीने देण्यात आली.
सप्ताहाचा प्रारंभ 1 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, रायगडचे अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे तसेच हभप मुरलीधर थोरवे यांच्या हस्ते विना पूजन करून झाला. सप्ताहाच्या कालखंडात रात्री 7 ते 9 या वेळेत हभप डॉ. गजानन महाराज काळे, माऊली महाराज जेऊरकर, सुखदेव महाराज वाघ, अशोक महाराज इदगे, समाधान महाराज शर्मा, संतोष महाराज काळोखे यांचे कीर्तन होणार आहे. काल्याचे कीर्तन तुकाराम महाराज मुंडे, बीड यांचे होणार आहे.
त्यानंतर काल्याचा महाप्रसाद वाटला जाणार आहे. याच कालखंडात ज्ञानेश्वरी पारायण, काकडा व नियमाचे भजन, भैरवनाथ प्रासादिक भजनी मंडळ शिरोली बुद्रुक, श्रीराम भजन मंडळ शिरोली खुर्द, अंबिका प्रासादिक भजन मंडळ शिंदे मळा, भक्तीधाम भजन मंडळ हिवरे बुद्रुक, मार्तंड भजन मंडळ तेजेवाडी, विठ्ठल भजन मंडळ कुरण, अमृतनाथ स्वामी भजन मंडळ निरगुडे यांचा जागर होणार आहे. सप्ताह कालखंडामध्ये ग्रामस्थांच्या वतीने रोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुढीपाडव्याला यात्रा
9 एप्रिल गुढीपाडव्याच्या दिवशी ग्रामदैवत भैरवनाथ व जोगेश्वरी माता यांचा अभिषेक, पूजा तर सायंकाळी शेरण्या दंडवते, भजनानंतर देवाच्या काठीची व पालखीची मिरवणूक होऊन रात्री 9 वाजता अंजलीताई नाशिककर यांचा तमाशाचा कार्यक्रम होणार आहे. दुसर्या दिवशी सकाळी हजेरी, दुपारी गाव बैठक व सायंकाळी आखाडा होऊन यात्रेची सांगता होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त ग्रामस्थ मंडळी शिरोली बुद्रुक यांच्याकडून करण्यात आले आहे.