पुणे, {प्रभात वृत्तसेवा} : नागरिकांनी होळी सण साजरा करण्यासाठी वृक्षतोड केल्याचे आढळल्यास संबधितांकडून १ लाखापर्यंत दंड आकारला जाईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. गेल्या काही वर्षांत शहराच्या अनेक भागात असे वृक्षतोडीचे प्रकार समोर आल्याने महापालिका प्रशासनाने या नियमाची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
याशिवाय, असा प्रकार आढळल्यास नागरिकांनी तक्रार करण्यासाठी महापालिकेकडून हेल्पलाइन क्रमांकही सुरू करण्यात आला असून, नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
येत्या रविवारी (दि. २४) होळी सण आहे. शहरात मोठ्या प्रमाणात हा सण साजरा केला जातो. त्यासाठी होळी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गोवऱ्या, तसेच लाकडांचा वापर केला जातो. मात्र, शहराच्या वन विभागाच्या हद्दीत असलेली, तसेच नदीकाठ आणि आसपासच्या परिसरातील झाडे काही दिवस आधीच तोडून ती विक्रीसाठी ठेवली जातात; अथवा गुपचूपपणे वापरली जातात.
त्यामुळे महापालिकेडून या वर्षी खबरदारी म्हणून असे प्रकार घडल्यास मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महापालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी दिली.
तक्रारीसाठी हेल्पलाइन सुविधा
विनापरवाना वृक्षतोडीचे प्रकार घडत असल्यास अथवा घडलेले असल्यास नागरिकांना तत्काळ महापालिकेशी संपर्क साधण्यासाठी हेल्पलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याअंतर्गत नागरिक १८००१०३०२२२ या टोल फ्री क्रमांकावर, ९६८९९००००२ या व्हाॅट्सअप क्रमांकावर तक्रार करू शकतात, तसेच ९२२३०५०६०७ या मोबाईल क्रमांकावरही नागरिकांना एसएमएसद्वारे तक्रार करता येणार आहे.
या कायद्यानुसार होणार कारवाई
महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन (सुधारणा) अधिनियम २०२१ या कायद्यानुसार, विनापरवाना झाडे जाळणे, तोडणे किंवा कोणत्याही प्रकारे झाडास हानी पोहचविणे, असे कोणतेही कृत्य करणे हा गुन्हा आहे. अशा गुन्ह्यासाठी शासनाच्या सूचनेच्या सूत्रानुसार काढलेल्या मूल्याइतके; परंतु एक लाख रुपयांपेक्षा अधिक नसेल इतक्या रकमेच्या दंडाची तरतूद आहे.