नवी दिल्ली – करोनामुळे देशात दोन प्रकारचे चित्र निर्माण झाले आहे. त्यात एका भारतातील लोक घरात योगा करीत आहेत, अंतक्षरी खेळत रामायणही पहात आहेत तर दुसऱ्या भारतातील लोक घरी पोचण्यासाठी आणि आपल्या जगण्यासाठी धडपडत आहेत, अशी टीका ज्येष्ठ कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण घरात योगा करीत असल्याचा व्हिडीओ लोकांसाठी शेअर केला आहे तर दुसरीकडे मोठ्या शहरांतून आपल्या गावाकडे परतणाऱ्या हजारो स्थलांतरीत मजुरांवर सध्याच्या निर्बंधांमुळे मोठीच आफत आल्याचे दिसून आले आहे. या स्थलांतरीतांनी पायीच घरी जाण्याचा रस्ता धरला परंतु त्यांना आता पुढे जाण्यासही मज्जाव करण्यात आला असून अनेक ठिकाणी त्यांचे अन्नापाण्यावाचून मोठेच हाल झाल्याच्याही बातम्या आल्या आहेत या पार्श्वभूमीवर कपिल सिब्बल यांनी देशातील या स्थितीवर मार्मिक शब्दात टीका केली आहे.