मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पोलीस स्टेशनमधील एका कॉन्स्टेबलची करोना चाचणी केली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर प्रशासनाने तातडीने खबरदारी म्हणून त्याच्या कुटुंबीयांसह संपर्कात आलेल्या 32 पोलीस कर्मचाऱ्यांना होम क्वांरटाइन करण्यात आले आहे. राज्यात पोलीस शिपाईला करोनाची लागण होण्याची ही पहिलीच घटना आहे. यामुळे राज्यात करोनाचा धोका वाढण्याची चिन्हे दिसून येऊ लागली आहेत.
याबाबात अधिक माहिती अशी की, ठाणे जिल्ह्यातील कल्याण टाउनशिप येथील पोलीस कर्मचाऱ्याला श्वास घेताना अस्वस्थता आल्याची तक्रार आल्यानंतर सोमवारी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर करोना व्हायरससाठीची टेस्ट घेतल्या असता ती पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर त्यांनी 14 मार्चपासून 27 मार्चपर्यंत इतर पोलिसांसह ड्युटीवर होते.
सध्या उपनगरीय रेल्वे सेवा बंद आहे. मात्र, या दरम्यान काही प्रवाशांच्या ते संपर्कात आले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरील अन्य लोकांचाही शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, करोनाची लक्षणे दिसताच संबंधित कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली. तसेच हवालदाराच्या कुटुंबातील सदस्यांसह संपर्कात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना होम क्वांरटाइन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.