पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने राबविलेल्या कर्मचारी भरती प्रक्रियेनंतर आयुक्तांनी नियुक्त केलेल्या ३८७ उमेदवारांपैकी १०० उमेदवारांना महापालिकेत रुजू करुन घेतले आहे. काही कर्मचाऱ्यांना कर संकलन विभाग आणि अग्निशमन विभागाच्या सर्वेक्षणासाठी नेमले जाणार आहे.
महापालिकेच्या १५ विविध पदांच्या ३८७ जागांसाठी मे २०२३ मध्ये राज्यभरात ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे तपासण्याची प्रक्रिया पूर्ण करून त्यांचे पूर्वचारित्र्य वर्तणूक पडताळणी (पोलीस व्हेरिफिकेशन) आणि शारीरिक पात्रता तपासणी (मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट) घेण्यात आले आहे. उमेदवारांनी कागदपत्रे जमा केली आहेत. पात्र असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना रुजू करून घेण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार २४ जानेवारीपासून कर्मचाऱ्यांना रुजू करून घेण्यात येत आहे. मंगळवार (दि. ३०) अखेर १०० कर्मचाऱ्यांना रुजू करून घेण्यात आले. त्यांना ५ फेब्रुवारीनंतर प्रशिक्षण दिले जाणार आहे.
काही कर्मचाऱ्यांकडून कर संकलन विभागाच्या मिळकतीचे ड्रोन सर्वेक्षण आणि अग्निशमन विभागाकडून व्यापारी आस्थापनांचे फायर सर्टिफिकेट तपासणी केली जात आहे. लिपिकांना कोथरूड येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गर्व्हन्मेंट (अखिल भारतीय स्थानिक स्वराज संस्था) प्रशिक्षण देण्यात येणार आहे. स्थापत्य विभागाचे ४८ अभियंते, विद्युत विभागाचे १८ कनिष्ठ अभियंते, ७४ स्थापत्य अभियांत्रिकी सहायक असे एकूण १४० कर्मचारी रुजू होणार आहेत. त्यांना महापालिका क्षमता निर्माण आणि संशोधनासाठी मुंबई येथील एमसीजीएम केंद्रात पाच दिवसांचे निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
महापालिकेत नव्याने नियुक्त केलेले कर्मचारी रुजू होत आहेत. १०० कर्मचारी रुजू झाले आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. दैनंदिन कामकाज शिस्तबद्धपणे व मुदतीमध्ये करणे त्यांना सुलभ होईल. महापालिकेचे नियम, कामकाजाची संगणक प्रणाली, कामकाज कसे करावे, हे अवगत होणार आहे.
– विठ्ठल जोशी, उपायुक्त सामान्य प्रशासन विभाग