तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – मावळ तालुक्यातील शेतकरी बांधवांना शेती व शेतीपुरक व्यवसाय करण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्यामाध्यमातून सुमारे १०० कोटी रूपये कर्ज वाटप केले जाणार असून त्यासाठी शासनाच्या व्याज अनुदानाचा फायदा शेतकरी बांधवांना देणार आहे, अशी माहिती बॅंकेचे संचालक ज्ञानेश्वर तथा माऊली दाभाडे यांनी दिली.
बॅंकेचे संचालक माऊली दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली तळेगाव दाभाडे शाखेत बॅंक वसुली अधिकारी, शाखा अधिकारी यांची संयुक्त सभा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी माऊली दाभाडे यांनी माहिती दिली. या सभेला बॅंकेचे उपव्यवस्थापक संजय शितोळे, विभागिय अधिकारी गुलाब खांदवे, बॅंक वरीष्ठ अधिकारी धवलराज पवार, निलेश खोत, सह बँक अधिकारी तसेच योगेश राक्षे, बाबुराव येवले, गणेश काजळे आदी उपस्थित होते.
माऊली दाभाडे म्हणाले की, केंद्र व राज्य शासनामार्फत शेतकरी बांधवांना जे कर्ज दिले जाते त्या कर्जावरील व्याजासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर अनुदान व व्याजातील सुटही दिली जाते. तसेच शेतकरी बांधवांना पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, कृषी पायाभूत सुविधा निधी, वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळ व इतर अनुष॔गिक योजना आदींच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असून त्यावरील व्याजासाठी अनुदान व व्याजातील सुटही दिली जाणार आहे.
शेतकरी बांधवांना शेतीबरोबरच, शेतीला पुरक असणाऱया जोडधंद्याला कर्जपुरवठा केला जाणार आहे. गाई, म्हैस, शेळ्या, मेंढ्या पालन तसेच कुकुटपालन, यांत्रिकीकरण ट्रॅक्टर व इतर शेतीयंत्र खरेदी करण्यासाठी कर्ज पुरवठा देखील केला जाणार आहे. शेतकऱयांना १० लाख रुपयांपासून ४० लाख रूपयांपर्यत कर्ज पुरवठा केला जाणार आहे.
ही कर्जे १ एप्रिलपासून दिली जाणार आहेत. लाभार्थ्यानी नजीकच्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या कर्ज विभागात संपर्क करावा, असे आवाहन बॅंकेचे संचालक माऊली दाभाडे यांनी केले आहे. माऊली दाभाडे, संचालक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक