कराड – पुणे येथील शरद मोहोळ खून प्रकरणात कराडमधील पोलीस रेकॉर्डवरील संशयित धनंजय मारुती वटकर याला गुरुवारी अटक करण्यात आली. मोहोळवर गोळीबार करणार्या हल्लेखोरांना वटकरने पिस्तूल पुरवल्याची माहिती मिळाल्याने पुणे पोलिसांनी त्याला अटक केली.
पुण्यातील कोथरूड भागात तीन हल्लेखोरांनी शरद मोहोळवर भरदिवसा गोळ्या झाडून खून केला होता. या खुनाचे धागेदोरे कराडपर्यंत पोहचले आहेत. या घटनेनंतर पुणे पोलिसांची पथके ठिकठिकाणी रवाना झाली होती. या पथकांनी पुणे-सातारा महामार्गावर संशयितांना अटक केली होती. या गुन्ह्यात दोन वकिलांनाही अटक करण्यात आली आहे.
अटकेतील संशयितांकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांना आणखी काही धागेदोरे मिळाले. मोहोळवर गोळीबार करण्यासाठी कराड येथील धनंजय वटकरने पिस्तूल पुरवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वटकर याच्यावर कराडमध्ये गुन्हे दाखल आहेत. ओगलेवाडी येथे मार्च 2023 मध्ये दहा जणांना अटक करून तब्बल चौदा पिस्तुले जप्त करण्यात आली होती. त्यात वटकरचा सहभाग होता.