मुलुंड : लिफ्टने चिरडल्यामुळे एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मुलुंड पूर्वेला एका गृहनिर्माण सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावर ही दुर्देवी घटना घडली. संजय यादव असे मृताचे नाव असून, ते लिफ्ट दुरुस्त करण्याचे काम करत होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुलुंड पूर्वेला न्यू पीएमजीपी सोसायटीमधील रहिवाशांनी लिफ्ट व्यवस्थित कार्य करत नसल्याची तक्रार केली होती. बिल्डरने व्यवस्थित काम केलेले नसल्यामुळे लिफ्ट सातव्या आणि 15व्या मजल्यावर अचानक थांबायची, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.
सोसायटीतील सदस्यांनी संजय यादव यांना प्रॉब्लेम समजावून सांगितला. त्यांनी लिफ्ट उघडून दुरुस्ती काम सुरु केले. त्यावेळी 13व्या मजल्यावर कोणीतरी लिफ्टचे बटण दाबले. त्यामुळे लिफ्ट अचानक सुरु झाली व भिंतीला लागून काम करणारे संजय चिरडले गेले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.