पुणे – मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. राज्यातील गावागावांमध्ये आंदोलन, साखळी उपोषण, आमरण उपोषण सुरु आहेत. तसेच काही ठिकाणी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करूनही पाठिंबा दिला जात आहे. पुणे शहरातील नांदेड गाव ग्रामस्थ व नांदेड सिटी येथील मराठा समाज बांधवांनी एक दिवसीय साखळी उपोषण करून मराठा आरक्षणासाठीच्या आदोलनाला पाठिंबा दिला.
नांदेडगांव ग्रमास्थ व नांदेड सिटी येथील मराठा समाज बांधवांकडून मंगळवार (दि. 31) नांदेड सिटी गेट रिक्षा स्टॅंड जवळ एक दिवसीय साखळी उपोषण करण्यात आले. तसेच सायंकाळी 6 ते 8 या वेळेत नांदेड सिटी गेट पासून जुना नांदेड गांव रोड ते वडजाई माता मंदिरापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. यावेळी ‘परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढा तिखट..’, ‘आत्ता नाही तर कधीच नाही’, ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देण्यात आल्या.