पणजी :- युवा कर्णधार श्वेता कदमच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्र महिला रोल बॉल संघाने मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शानदार विजय सलामी दिली. महाराष्ट्र संघाने उत्तर प्रदेश संघावर ६-४ अशा फरकाने दणदणीत विजय साजरा केला. मानसी पाटील, महेक आणि श्वेता कदम यांच्या सर्वोत्तम कामगिरीमुळे महाराष्ट्र संघाला मोठा विजय नोंदवता आला. मुख्य प्रशिक्षक अमित पाटील यांनी विजय सलामीसाठी खास डावपेच आखले होते.
महाराष्ट्र संघाने सकाळच्या पहिल्या सत्रात सामन्यात चांगले सुरुवात केली. यामुळे उत्तर प्रदेश संघाचा आघाडीचा प्रयत्न वेळोवेळी अपयशी ठरला. यादरम्यान महाराष्ट्राची गोलरक्षक मानसी पाटीलची कामगिरी लक्षवेधी ठरली. तिने उत्तर प्रदेश संघाचा आघाडीचा प्रयत्न हाणून पाडला.
“स्पर्धेतील दमदार विजयने महाराष्ट्र संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे आता आम्ही हीच मोहीम कायम ठेवत सोनेरी यशाचा पल्ला निश्चितपणे गाठू. यासाठी सर्वच खेळाडू सज्ज झाले आहेत,” अशा शब्दांत कर्णधार श्वेता कदमने विजयाचा आनंद व्यक्त केला.