UEFA Euro Cup 2024 : वाऊट वेघोर्स्टच्या खेळीने नेदरलँड्सचा दमदार विजय…

UEFA Euro Cup 2024 (Poland Vs Netherlands) :- सातत्याने राखीव खेळाडू म्हणून मैदानात उतरण्याची खासियत असलेल्या आघाडीपटू वाऊट वेघोर्स्टने पुन्हा एकदा आपले कसब दाखवून देत युरो फुटबॉल स्पर्धेत रविवारी नेदरलँड्सला पोलंडविरुद्ध २-१ असा विजय मिळवून दिला.
अचूक पास, चेंडूवरील सर्वाधिक ताबा आणि गोल जाळीच्या दिशेने सर्वाधिक फटके मारुनही नेदरलँड्सला आघाडी घेण्यात अपयश आले. यामध्ये मेम्फिस डीपेने गोल करण्याच्या अनेक संधी दवडल्यानंतर ८१व्या मिनिटाला मैदानात उतरलेल्या वेघोर्स्टने ८३व्या मिनिटाला गोल करण्याची अचूक संधी साधली आणि नेदरलँड्सचा विजय साकार केला.
पोलंडसारखा तगडा प्रतिस्पर्धी समोर असूनही नेदरलँड्सने कमालीच्या नियोजनपद्धतीने खेळ करून सामन्यात वर्चस्व राखले. लेवांडोवस्की खेळत नसल्याचा फायदा नेदरलँड्सने पुरेपूर उठवला आणि एका सफाईदार विजयाची नोंद केली. या विजयाने नेदरलँड्सने गेल्या आठ मोठ्या स्पर्धेतील सलामीचा सामना जिंकण्याची परंपरा कायम राखली.
सामन्याच्या १६व्या मिनिटाला अॅडम बुक्साने शानदार हेडर करत पोलंडला आघाडीवर नेले होते. यावेळी बुक्साने आपल्या ६ फूट ३ इंच उंचीचा पुरेपूर फायदा घेतला. त्यानंतर पूर्वार्धातच कोडी गाकपोने नेदरलँड्सला बरोबरी साधून दिली. पोलंडचा गोलरक्षक वोजिएच स्झेस्नीला गाकपोची किक अडवता आली नाही. एक गोलच्या बरोबरीनंतर सामन्याच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत झालेल्या संघर्षात सामन्याच्या ८३व्या मिनिटाला दोनच मिनिटांपूर्वी राखीव खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या वेघोर्स्टने नेदरलँड्ससाठी विजयी गोल केला.
UEFA Euro Cup 2024 : सलामीच्या सामन्यात जर्मनीकडून स्कॉटलंडचा धुव्वा…
अखेरचा प्रयत्न म्हणून नेदरलँड्सच्या प्रशिक्षकांनी वेघोर्स्टला ८१व्या मिनिटाला मैदानात उतरवले. नेदरलँड्सच्या एकेने मुसंडी मारून पोलंडच्या वेघोर्स्टकडे पास दिला. त्याने ही संधी अचूक साधली. वेघोर्स्टने राखीव खेळाडू म्हणून अगदी अखेरच्या क्षणी मैदानावर उतरविल्यावर नेदरलँड्साठी गोल करण्याची भूमिका दुसऱ्यांदा निभावली.





