लोणावळा – वर्धमान सोसायटी, लोणावळा येथील गुरुकृपा डिस्ट्रिब्युशन येथे छापा टाकून पुणे ग्रामीणच्या एलसीबी पथकाने एका व्यक्तीला दोन गावठी पिस्तूल, एक काडतुस, एक लोखंडी कोयता व रेम्बो चाकूसह ताब्यात घेतल्याची घटना समोर आली आहे.
पुणे ग्रामीण “एलसीबी’चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज विजय अगरवाल (वय 40, रा. कल्पतरू हॉस्पिटल समोर, वर्धमान सोसायटी, लोणावळा) असे या अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पुणे ग्रामीणच्या एलसीबी पथकाला गुप्त खबर मिळाली होती, की लोणावळ्यातील सूरज अगरवाल याच्याकडे दोन गावठी पिस्तूल व काही बेकायदेशीर हत्यारे आहेत. त्या अनुषंगाने सापळा लावला. गुरुवारी गुरुकृपा डिस्ट्रिब्युशन येथे सूरज याला ताब्यात घेत अंगझडती घेतली असता त्यांच्या कंबरेला एक पिस्तुल व “मॅग्झिन’मध्ये एक जिवंत काडतुस मिळून आले.
तसेच त्याच्या गोदामामध्ये एका रूमच्या बाहेर चार कप्पे असलेले लोखंडी रॅकची पाहणी केली असता आणखीन एक गावठी कट्टा तसेच कोयता व रेम्बो चाकू मिळून आला असल्याचे घनवट यांनी सांगितले. हे विनापरवाना व बेकायदेशीर बाळगलेले 2 गावठी पिस्तुल 1 जिवंत काडतुस, लोखंडी कोयता, रॅबो चाकू असा एकूण एक लाख 9 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलेला आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहायक फौजदार दत्तात्रय जगताप, पोलीस हवालदार सुनील जावळे, प्रकाश वाघमारे, मुकुंद आयचीत, प्रमोद नवले, लियाकत मुजावर, सुधीर अहिवळे, अक्षय नवले, प्रसन्नजीत घाडगे, बाळासाहेब खडके, समाधान नाईकनवरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. अगरवाल याला पुढील तपासणीसाठी लोणावळा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.