नागठाणे, (प्रतिनिधी) – माजगाव, ता. सातारा येथील साडेचार तोळ्याच्या मंगळसूत्र चोरीचा 24 तासात छडा लावत याप्रकरणी बोरगाव पोलिसांनी चोरी करणार्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले असून या मुलाने ज्याच्याकडे हे चोरीचे मंगळसूत्र ठेवले होते त्या बाळासो बाबूराव बर्गे (रा. माजगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, माजगाव येथील ज्योती जाधव या दि. 3 रोजी यात्रेनिमित्त नातेवाईकांकडे गेल्या होत्या. रात्री घरी परतल्यानंतर त्यांच्या कपाटातील लॉकरमधील साडेचार तोळ्याचे 3 लाख 15 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याचे त्यांना आढळून आले. या घटने अगोदर एकदा अशाच प्रकारे सोन्याचे ब्रेसलेट व रोकड चोरीस गेली होती.
त्यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार देत काही संशयितांची नावेही डीबी पथकाला सांगितली होती. पथकाने याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करताना त्याने चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेल मंगळसूत्र त्याच गावातील बाळासो बाबूराव बर्गे याच्याकडे दिले असल्याचे मुलांना पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी याप्रकरणी चोरीतील ऐवज जवळ बाळगल्याप्रकरणी बाळासो बर्गे याला अटक करत चोरीतील मंगळसूत्र हस्तगत केले आहे. डीबी पथकातील अंमलदार हवालदार दादा स्वामी, पो. ना. प्रशांत चव्हाण, दीपककुमार मांडवे, कॉ. केतन जाधव, विशाल जाधव यांनी अवघ्या चोवीस तासांत या चोरीचा गुन्हा उघड करत संशयितांना ताब्यात घेण्याची कामगिरी केली आहे.