कामशेतमधील ‘ट्राफिक’वर ‘रामबाण’

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून उपाय योजना

कामशेत – कामशेत मधील वाहतूक कोंडी नियंत्रणात ठेवण्यासाठी मुबलक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने कमी मनुष्यबळ वापरून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कामशेत पोलिसांकडून वेगवेगळ्या उपाय योजना व शर्तीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

कामशेत ही तालुक्‍यातील प्रमुख बाजारपेठ असल्याने अनेक गोष्टींच्या खरेदी-विक्रीसाठी कामशेतला तालुक्‍यातील लोकांची नेहमीच वर्दळ असते. त्यात गेल्या तीन वर्षांपासून कामशेत हद्दीतील महामार्गावर सुरू असणारे उड्डाणपुलाच्या कामामुळे बाजारपेठेतील रस्त्यावरून वाहनांची वर्दळ वाढली, तसेच आणि बाजारपेठेतील रस्त्यावरील अतिक्रमणे या सर्वांमुळे कामशेत बाजारपेठेची कोंडी होत आहे. वारंवार होणारी वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी दोन पोलीस कर्मचारी, चार होमगार्ड व तीन ट्राफिक वार्डन कामशेत बाजारात कोंडी फोडण्याचे काम करीत आहे.

कामशेत बाजार पेठेत तीन मोठ्या शाळा आहेत तसेच रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता देखील बाजारपेठेतून आहे. याशिवाय बॅंका, पतसंस्था, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी व मंडळ, कृषी, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशू वैद्यकीय दवाखाना ही सर्व कार्यालये बाजारपेठेतच असल्याने शाळकरी मुले प्रवासी व अन्य नागरिकांची बाजारपेठेतील रस्त्यावर वर्दळ असते.
एवढ्या वर्दळीच्या बाजारपेठेतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दोन पोलीस होमगार्ड व वार्डनच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यसाठी प्रयत्न करत असतात.

पवनानगर फाट्यावर महामार्गावरील पुलाचे काम सुरू असल्याने महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यावरून वळविण्यात आली आहे. कामशेतला जोडणारा पवनानगर रस्ता याच ठिकाणी येऊन मिळत असल्याने या ठिकाणी महामार्ग ओलांडून नागरिकांना जावे लागत असल्याने पोलिसांकडून सायंकाळी पाच ते रात्री आठपर्यंत याठिकाणी अंडरबायपास बंद ठेवण्यात येतो. त्याठिकाणची वाहतूक सुरळीत ठेवण्यसाठी दोन होमगार्ड उपस्थित असतात तसेच बाजारपेठेत खरेदीसाठी आलेले नागरिक रस्त्यावरच वाहने उभी करतात.

वाहतुकीस अडथला निर्माण होत असल्याने बाजार पेठेत पोलिसांकडून “जॅमर’द्वारे कारवाई करण्यात येत आहे. कामशेतमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी सकाळी दहा ते रात्री नऊपर्यंत एक ट्राफिक वार्डन नेमण्यात आला आहे. तसेच कामशेत पवनानगर रोडचे काम सुरू असल्याने अर्धारस्ता अडविण्यात आला असल्याने पवनानगर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी दोन होमगार्ड काम करतात. वेळेनुसार नाणे रोड, रेल्वे स्टेशन चौकात वाहतूक सुरळीत करत असतात. अशा प्रकारचे वाहतुकीचे नियोजन केले असल्याची माहिती सहाय्यक फौजदार दतात्रय खंडागळे यांनी दिली आहे.

महिन्याभरात 524 वाहनांवर कारवाई
कामशेत पोलिसांनी जानेवारी महिन्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 524 वाहनांवर कारवाई करून 1 लाख 40 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. कामशेत बाजारपेठेत वर्षापूर्वी नवीन बनविण्यात आलेल्या रस्त्याची उंची वाढली आहे आणि साईट पट्ट्या व्यवस्थितपणे न भरल्याने वाहने रस्त्याची खाली उतरत नसल्याने नागरिक रस्त्यावरच वाहने उभी करत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आहे.

कामशेत हद्दीतील पुणे-मुंबई महामार्गावर सुरू असणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अधिक मनुष्यबळ वापरावे लागते. पोलीस ठाण्यात अपुरे मनुष्य बळ असल्याने उपलब्ध मनुष्यबळात वेगवेगळ्या उपाययोजना राबवून आम्ही वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
– विठ्ठल दबडे, पोलीस निरीक्षक, कामशेत पोलीस ठाणे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.