मुंबई – रिझर्व्ह बॅंक आणि अर्थ मंत्रालयाने देशातील परकीय चलनाचा साठा वाढावा म्हणून अनेक उपाय योजना करूनही रुपयाचे मूल्य एकतर्फी कमी होणे चालूच आहे. गुरुवारी रुपयाचा भाव नऊ पैशांनी कोसळून 79.90 रुपये प्रति डॉलर या नव्या निचांकी पातळीवर गेला.
शेअर बाजारातून परदेशी गुंतवणूक परत जात आहे. त्यामुळे रुपयाचे मूल्य कमी होत आहे. आता कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलरच्या खाली गेल्या आहेत. त्यामुळे रुपयाला काही प्रमाणात आधार मिळाला. अन्यथा रुपयाचा भाव आणखी कमी झाला असता असे विश्लेषकांनी सांगितले.
डॉलर वधारत असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतातून विक्री करून नफा काढून घेत आहेत. काल या गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 2,839 कोटी रुपयांचा नफा काढून घेतला. रिझर्व बॅंकेने परकीय चलन आकर्षित करण्यासाठी आणि आहे ते परकीय चलन देशात राहावे याकरिता बऱ्याच उपाययोजना केल्या आहेत. मात्र तरीही डॉलर वधारत असल्यामुळे भारतातून परकीय गुंतवणूक परत चालली असल्यामुळे रुपयाचे मूल्य कमी होत आहे.
आणखी एक वर्ष तरी भारताला या परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. दरम्यानच्या काळात भारताने चालू खात्यावरील तूट कमी करण्यासाठी प्रयत्न चालू केले असले तरी ही तूट कमी होण्याची लक्षणे दिसून येत नाहीत.
आज जाहीर झालेल्या माहितीनुसार भारताची आयात निर्यातीपेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे भारताला आगामी काळात आयात कमी करण्यासाठी आक्रमक प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी अगोदरच भारताने सोन्यावरील आयात शुल्कात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे.