लंडन – क्रिकेट जगतात दबदबा निर्माण करणाऱ्या आयपीएलचे वादग्रस्त माजी आयुक्त आणि व्यावसायिक ललित मोदी यांनी सोशल मीडियावर काही फोटो टाकून सनसनाटी निर्माण केली. त्या फोटोंमधून 59 वर्षीय ललित यांची बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्याबरोबरची जवळीक समोर आली. त्यातून त्यांच्या विवाहाच्या चर्चांना उधाण आले. मात्र, अद्याप विवाह झालेला नाही. पण, त्या बंधनात अडकू शकतो, असे संकेत नंतर स्वत: ललित यांनी दिले.
क्रिकेट जगतात काही वर्षांपूर्वी ललित यांच्या नावाला मोठे वजन होते. आयपीएलचे थेट जनक म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. आयपीएलच्या प्रारंभाच्या काळात ललित यांची गणना हाय-प्रोफाईल व्यक्तिमत्वांमध्ये होत होती. पण, आयपीएलमधील अनियमितता समोर आल्या अन् ललित यांचे ग्रह फिरले.
केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा मागे लागल्याने त्यांनी काही वर्षांपूर्वी देश सोडून लंडनमध्ये आश्रय घेतला. त्यानंतर फारशा प्रसिद्धीझोतात नसलेले ललित अचानक ताज्या फोटोंमुळे मोठ्या चर्चेचा विषय बनले. ललित यांनी सोशल मीडियावर फोटो टाकतानाच काही कॅप्शनही दिल्या.
रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ; आता ड्रग्ज पुरवल्याचा आरोप
कुटूंबीयांसमवेत मालदिवची ट्रिप आटोपून लंडनला परतलो. अर्धांगिनी सुष्मितासमवेत नवे जीवन, नवी सुरूवात करत असल्याचे त्यांनी नमूद केले. ते फोटो आणि कॅप्शन पाहून सगळ्यांनीच त्यांनी विवाह केल्याचा समज करून घेतला. नंतर ललित यांनी एक ट्विट करून स्पष्टीकरण दिले. त्यांनी अद्याप विवाह झाला नसल्याचा खुलासा केला. मात्र, प्रेमसंबंधांची कबुली दिली. तसेच, एक दिवस विवाहसुद्धा होईल, असे सूचित केले. माजी मिस युनिव्हर्स असणारी सुष्मिता 46 वर्षांची आहे.
ग्लोबल टीचर डिसले गुरुजी यांचा पाय खोलात; गैरहजर प्रकरण भोवणार