मुंबई – अमेरिकेत आक्रमक व्याजदरवाढ आणखी काही काळ चालण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्यामुळे इतर बाजाराबरोबरच त्याचा चलन बाजारावर थेट परिणाम झाला. डॉलर वधारत असून इतर चलनाप्रमाणे रुपया कोसळत आहे.
मंगळवारी रुपयाचा भाव 76 पैशांनी कोसळून 82.61 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेला. गुंतवणूकदाराकडून शेअर बाजारात विक्री होऊन परकीय चलन परत जात आहे. चीनमधून मागणी वाढण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे खनिज तेलाचे दर वाढत आहेत. या दोन्ही घडामोडीचा भारताच्या रुपयावर परिणाम होत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.
अमेरिकेतील घडामोडीमुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी काल 1,039 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. दरम्यानच्या काळात जागतिक बॅंकेने भारताचा विकास दर वाढून 6.9% होणार असल्याचे सांगितले असले तरी याचा चलन किंवा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम होऊ शकला नाही.