Team India : टी-20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूची क्रिकेटमधून निवृत्ती! वाढदिवशी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत केली घोषणा…

Team India : भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. कार्तिकने त्याच्या 39 व्या वाढदिवसानिमित्त निवृत्तीची घोषणा केली. त्याने याबाबत सोशल मीडियावर एक लांबलचक भावनिक अशी पोस्ट लिहिली आणि एक व्हिडिओही जारी केला.
कार्तिकने नुकताच आयपीएलला अलविदा केले होते. दिनेश कार्तिकने सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये त्याचे कुटुंब आणि पत्नी दीपिका पल्लीकल यांच्यासह प्रशिक्षक आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत. सोशल मीडिया ट्विटर (X) वर लाल रंगाचा इमोजी पोस्ट करताना त्याने कॅप्शन लिहिले, ‘हे अधिकृत आहे.
2004 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा दिनेश कार्तिक 2007 मध्ये ‘टी20 विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता. नुकतेच त्याने टीम इंडियामध्ये फिनिशर म्हणून पुनरागमन केले होते. दिग्गज महेंद्रसिंग धोनीच्या आधी कार्तिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. धोनीच्या आधी आणि निवृत्तीनंतरही तो खेळला. दिनेश कार्तिकने 53 सेकंदाचा एक व्हिडिओ देखील जारी केला ज्यामध्ये तो टीम इंडियाच्या जर्सीत दिसत आहे. त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्तिक आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. 1 जून 2024 रोजी तो 39 वर्षांचा झाला आहे.
It’s official 💖
Thanks
DK 🙏🏽 pic.twitter.com/NGVnxAJMQ3— DK (@DineshKarthik) June 1, 2024
दिनेश कार्तिकने लिहिले की, “माझे आई-वडील या सर्व वर्षांत माझी ताकद बनून माझ्या सोबत राहिले. त्यांच्या आशीर्वादाशिवाय मी आता इथे नसतो जिथे मी आहे. मी माझी पत्नी दीपिकाचे सुद्धा आभार मानू इच्छितो, जी स्वतः एक खेळाडू आहे आणि जिने अनेकदा माझ्या सोबत प्रवास करताना तिचं करिअर होल्डवर ठेवलं.”
आता दिसणार ‘या’ भूमिकेत….
आयसीसी (ICC) टी-20 विश्वचषक 2024 हा 2 जूनपासून सुरू होणार आहे. विश्वचषक 2 ते 29 जून दरम्यान खेळवला जाणार असून दिनेश कार्तिकची आयसीसीने समालोचन समिती सदस्य म्हणून निवड केली आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर विश्वचषक सामन्यादरम्यान दिनेश कार्तिक कॉमेंट्री बॉक्समधून समालोचन करताना दिसणार आहे.
दिनेश कार्तिकची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
दिनेश कार्तिकने भारतासाठी 26 कसोटी, 94 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि 60 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्याने कसोटीत 1025 धावा केल्या तर एकदिवसीय सामन्यात 1752 धावा जोडल्या. टी-20 मध्ये त्याच्या नावावर 686 धावा आहेत. अशाप्रकारे देशाकडून खेळताना त्याने 180 सामन्यात 3463 धावा केल्या आणि विकेटमागे 172 विकेट घेतल्या.
दिनेश कार्तिकची आयपीएल कारकीर्द…
दिनेश कार्तिक त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 6 वेगवेगळ्या फ्रँचायझी संघांसाठी खेळला. त्याने 257 सामन्यात 4842 धावा केल्या ज्यात 22 अर्धशतकांचा समावेश आहे. वास्तविक, नुकताच दिनेश कार्तिक आयपीएलमध्ये खेळताना दिसला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर व्यतिरिक्त, दिनेश कार्तिक आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि गुजरात लायन्सकडून खेळला.





