अयोध्या – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येत रामाच्या दर्शनाला येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील त्यांच्या भेटीला विरोध करणाऱ्या तीन महंताना पोलिसांनी त्यांच्या घरातच काही काळ स्थानबद्ध ठेवले होते. या महंतांनी उद्धव ठाकरे यांना अयोध्या भेटीच्यावेळी काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता. रामाला विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांशी आघाडी केल्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही असा इशारा दिला होता.
या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळपासून महंत राजुदास, महंत परमहंस दास, आणि राकेश दत्त मिश्रा या तिघांना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणीच स्थानबद्ध करून ठेवण्यात आले होते अशी माहिती पोलिस अधिक्षक आशिष तिवारी यांनी सांगितली.
पोलिसांनी तीन पथके या तिन्ही जणांच्या निवासस्थानी पाठवून त्यांना प्रशासनाची नोटीस जारी केली.आणि त्यांना निवासस्थान पुढील अनुमती शिवाय न सोडण्याचा इशारा दिला. उद्धव ठाकरे यांनी रामलल्लाचे दर्शन घेतल्या नंतर त्या मंदिराचा परिसर गंगाजलाने धुऊन घेण्याची सुचनाही अयोध्येतील अनेक महंतांनी केली होती.