कोथरूड – वाट चुकलेला ‘गवा’ महात्मा सोसायटीत आला आणि काही तासांच्या थरारक घटनेनंतर त्या मुक्या प्राण्याला जीव गमवावा लागला. आता त्याच्या मृत्युला कारणीभूत कोण? असा प्रश्न उपस्थित झाला. या घटनेला गुरूवारी (दि. 9 डिसेंबर 2021) एक वर्षे पूर्ण होतील . त्यामुळे निसर्ग आणि प्राणी प्रेमींनी या गव्याच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त “प्रायश्चित सभा’ आयोजीत केली आहे.
शहराच्या वाढत्या विस्तारामुळे जंगले कमी झाली. त्यामुळे जंगलातील पशु शहरवस्तीत आल्यावर नागरिकांची धांदल उडते. एक वर्षांपूर्वी वाट चुकलेला गवा कोथरूड येथील महात्मा सोसायटीत आला आणि नागरिकांनी त्याला बघण्यासाठी गर्दी केली. मात्र, त्या गव्याला पकडण्याच्या प्रयत्नात मृत्यु झाला.
गुरूवारी या घटनेला एक वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने निसर्ग व प्राणी प्रेमी, चेंज इंडिया फाऊंडेशनचे संस्थापक सचिन धनकुडे यांनी या प्रायश्चित्त सभेचे आयोजन कोथरूड येथील भुसारी कॉलनी, धनकुडे प्लॉट याठिकाणी केले आहे.
विशेष म्हणजे धनकुडे यांनी गव्याची प्रतिमा असलेला पुतळा तयार करून घेतला. हा पुतळा महात्मा सोसायटी ते गव्याने जीव सोडला त्या जागेपर्यंत रॅली काढणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 6.30 वाजता प्रायश्चित सभा होणार असल्याची माहिती धनकुडे यांनी दिली.