पाटण तालुक्‍यात सरासरी 70 टक्के मतदान

विद्यमान आमदारांसह नऊ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात सील

पाटण – पाटण विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी सरासरी 70 टक्के एवढे मतदान झाले. विद्यमान आमदार शंभूराज देसाई व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळालेले सत्यजितसिंह पाटणकर यांच्यासह नऊ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे.

पाटण विधानसभा मतदार संघात सर्वत्र शांततेत मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीरंग तांबे यांनी दिली. सकाळी सात वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठी 54 टक्के मतदान झाले. तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत 63 टक्के मतदान झाले होते. एकूण 397 मतदान केंद्रावर मतदान सुरळीत पार पडले.

मात्र लोकसभेच्या एकूण 15 मतदान यंत्रात बिघाड झाल्याने त्या जागेवर पर्यायी मतदान यंत्र उपलब्ध करून देण्यात आले. बिघाड झालेल्या मतदान यंत्रातील केंद्रांमध्ये बागलेवाडी, बोंद्रे, वसंतगड, धुईलवाडी, सूर्यवंशीवाडी, गिरेवाडी, बनपेठ, नारळवाडी, जळगेवाडी, कळकेवाडी, घाणबी इत्यादी मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट कंट्रोल युनिट बॅलेट युनिट यामध्ये बिघाड झाला. त्याचप्रमाणे विधानसभा मतदान यंत्रात बोडकेवाडी, केळोली, मरळी, काळोली इत्यादी ठिकाणी मतदानयंत्र बंद पडल्याने काहीकाळ मतदान प्रक्रिया थांबली होती. दरम्यान डॉ. पी. के. जयश्री या निवडणूक निरीक्षक अधिकाऱ्यांनी पाटण विधानसभा परिसरातील 25 मतदान केंद्रावर भेटी देऊन सुरु असलेल्या मतदान व्यवस्थेची पाहणी केली.

पाटण शहरात असलेल्या काही मतदान केंद्रावर आमदार शंभूराज देसाई यांनी दिवसभरात ठराविक अंतराने सतत भेटी देऊन मतदान केंद्रावर ठिय्या मांडला. त्यामुळे काहीकाळ या केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजाभाऊ काळे यांनी आमदार शंभूराज देसाई यांच्या विरोधात पाटण पोलीस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज देऊन मतदान केंद्रावर आमदार देसाई यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार दिली होती.

तर आमदार शंभूराज देसाई यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटण या मतदान केंद्रात फोटो काढत असणाऱ्या छायाचित्रकारावर आक्षेप नोंदवला. त्यामुळे केंद्राध्यक्ष यांनी छायाचित्रकारावर आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा पोलिसात दाखल केला. दरम्यान आमदार शंभूराज देसाई यांनी मरळी येथील मतदान केंद्रावर तर सत्यजितसिंह पाटणकर यांनी पाटण येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीरंग तांबे म्हणाले की, 397 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. एकूण 70 टक्के मतदान झाले असून त्यामध्ये पुरूष 97 हजार 125 तर 94 हजार 376 स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. सर्व मतदान यंत्र तहसील कार्यालयात एकत्रित करून सातारा येथे मतमोजणीसाठी ताब्यात दिली जाणार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)